न्याय मागणाऱ्यांवर अन्याय! अखेर राज्यभरातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

ब्रह्मपुरीतही कामकाज ठप्प
   

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
          समान काम, समान वेतन या अत्यंत न्याय्य आणि प्रलंबित मागणीसाठी अखेर महाराष्ट्रातील सुमारे ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी आज, १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संपावर गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव २० ते २२ महिने लोटूनही राज्य सरकारने मंजूर न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची धग ब्रह्मपुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापर्यंत पोहोचली असून, येथील सर्व कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
           मायबाप सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य शासनाची चालढकल वृत्ती आणि न्याययंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेली अनास्था या संपाचे मुख्य कारण ठरली आहे. मा. उच्च न्यायालयाने गत १ जानेवारी २०२५ पासूनच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान वेतन व सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, असा स्पष्ट प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु, तब्बल २० ते २२ महिन्यांचा मोठा कालावधी लोटूनही शासन दरबारी या फाईलवर केवळ लालफितीचा कारभार सुरू राहिला. उच्च न्यायालयाच्या निर्देश आणि प्रस्तावाला अक्षरशः केराची टोपली दाखवल्यामुळे, राज्य शासन हे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे का, असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे. हक्काची वेतनश्रेणी मिळवण्यासाठी अखेर न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना न्यायमंदिराजवळच आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे.
               शासनाच्या या धोरणविरोधी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शोषण करणाऱ्या भूमिकेविरोधात राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे, या बेमुदत संपाला केवळ सेवेतील कर्मचारीच नव्हे, तर सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी, विविध कामगार-कर्मचारी संघटना तसेच वकील संघांनी (अधिवक्ता गण) देखील उघड पाठिंबा जाहीर केला आहे.
           न्याय देणाऱ्या यंत्रणेतील घटकांनाच जर न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर हे प्रशासकीय व्यवस्थेचे मोठे अपयश मानले जात आहे. जोपर्यंत शासन समान वेतन आणि सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव तात्काळ मान्य करून तसा शासन निर्णय निर्गमित करत नाही, तोपर्यंत हा लढा असाच तीव्र ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पक्षकारांना मात्र न्याय मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असून, संपूर्ण न्यायव्यवस्थाच एका अर्थाने रेषेवर आली आहे.

  Post Views:   330


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी