ब्रह्मपुरीतील टिळक नगरमधील ४५ वर्षीय मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
शहरातील टिळक नगर परिसरात आज, रविवारी (२ ऑगस्ट २०२६) एक अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी असलेले ईश्वर राऊत (वय ४५ वर्षे, व्यवसाय: मजुरी) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घराजवळ लहान मुले खेळत होती. खेळता खेळता मुलांचे लक्ष राऊत यांच्या उघड्या दरवाजाकडे गेले. घरात डोकावून पाहिले असता ईश्वर राऊत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. मुलांनी तात्काळ या घटनेची माहिती आसपासच्या नागरिकांना दिली.
स्थानिक नागरिकांच्या आणि लोकचर्चेनुसार, ईश्वर राऊत यांनी दुपारीच हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय (शवविच्छेदन) तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.