राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक

महाराष्ट्राच्या शिरपेचात ब्रह्मपुरीच्या प्रणयने रोवला मानाचा तुरा
   

ब्रम्हपुरी/महेश पिलारे
  अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) आणि ओडिशा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ४० व्या राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (40th National Junior Athletics Championship) १८ वर्षाखालील १००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील प्रणय गणेश उपासे (१७ ) याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकाविले आहे. ४० व्या राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवून प्रणयने ब्रह्मपुरीच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रणयचे ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथे आगमण होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. 
     वडिलांचे छत्र हरपलेला प्रणय आई व छोट्या बहिणीसोबत येथील पेठ वॉर्डात वास्तव्यास आहे. तुटपुंजी शेती असल्याने आई मजुरी करते. हातावर आणणे आणि पाणावर खाणे, ही त्यांची परिस्थिती आहे. अशा ही परिस्थितीत प्रणयचे १ते १० वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हिंदू ज्ञान मंदिर येथे झाले. ११ वीला त्याने लो.टि. विद्यालयात प्रवेश घेतला. सध्या तो १२ वीला आहे. लहानपणापासून खेळाची आवड असल्याने त्याने धावण्याच्या शर्यतीला महत्त्व दिले. इयत्ता ५ व्या वर्गापासून त्याने धावण्याच्या शर्यतीचा नियमित धावण्याचा सराव केला. आपल्या खेळात पारंगत व्हावे म्हणून प्रणय ने नागपूर येथील खेल अ‍ॅकडमीचे मार्गदर्शक गजानन ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ३ वर्ष सराव केला. तसेच ब्रम्हपुरी येथील मार्गदर्शक रोहित बुरांडे यांचेही प्रणयला मार्गदर्शन लाभले. ४० व्या राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दि. १० - १४ या कालावधीत भुवनेश्वर येथे पार पडली. त्यात हरियाणाचा प्रिन्स प्रथम, द्वितीय क्रमांक उत्तराखंड येथील सुरज सिंग याने मिळविला. तर महाराष्ट्रातील एकमेव धावपटू प्रणय उपासे याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक जिंकले आहे. मागील वर्षी देखील पटना ( बिहार ) येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक प्राप्त केला होता, हे विशेष. प्रणयचे ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथे आगमण होताच फटाक्यांची आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी क्रिडा व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी प्रणयला पुष्पगुच्छ देत समोरील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ब्रम्हपुरी ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. अनेक खेडाळू यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकले आहेत. प्रणयच्या यशाने ब्रम्हपुरी शहराच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रणयचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

  Post Views:   532




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी