महाविकास आघाडीला मोठा धक्का! चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विजयी
ब्रह्मपुरी:
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कोठारी या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रमुख प्रतिस्पर्धीच मैदानाबाहेर पडल्याने मतदानाची गरज उरली नाही आणि लखानी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसमधीलच काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी, संख्याबळाचा अभाव आणि काही नेत्यांनी चक्क भाजप उमेदवाराला मदत करत पैसे वाटप केल्याचा खळबळजनक दावा अग्रवाल यांनी केला आहे.
अरुण लखानी यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अग्रवाल यांच्या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विजयामुळे विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ आणखी एक ने वाढले असून, महायुतीने महाविकास आघाडीला मोठा राजकीय अस्मान दाखवले आहे.