बारई तलाव हडपण्याचा डाव? महसूल अभिलेखातील संशयास्पद फेरफाराची चौकशी करा

नियोजन सभापती सचिन राऊत यांची मागणी
   

ब्रम्हपुरी :
            ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारई तलावाच्या अस्तित्वावरच आता महसूल विभागाच्या संशयास्पद नोंदीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष जागेवर तलाव फेसाळत असताना डिजिटल सातबारा उताऱ्यावर मात्र 'तलाव' ही मूळ नोंद गायब करून त्याऐवजी 'घरपड' अशी नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे नियोजन सभापती सचिन केवळराम राऊत यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
             ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे नियोजन सभापती सचिन केवळराम राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी शहरातील गट क्रमांक ५२२ मध्ये पूर्वपरंपरेपासून बारई तलाव अस्तित्वात आहे. जुन्या सातबारा उताऱ्यातील 'इतर हक्क' रकान्यात स्पष्टपणे 'तलाव' अशी नोंद होती. इतकेच नव्हे तर शहराच्या जुन्या विकास आराखड्यातही या जागेवर 'तलाव व सुशोभीकरण' असे कायदेशीर आरक्षण दर्शवण्यात आले होते. प्रशासनाकडून डिजिटल सातबारा संगणकीकृत करताना ही मूळ नोंदच गायब करण्यात आली असून, त्याऐवजी 'घरपड' असा फेरफार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात आजही या जागेवर तलाव सुस्थितीत दिसत असताना, कागदोपत्री मात्र त्याला 'घरपड' दाखवून तलावाची जमीन हडपण्याचा किंवा भूमाफियांना मोकळे रान करून देण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा तीव्र संशय व्यक्त होत आहे.
          बारई तलावाच्या बाबतीत असा गैरप्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तलावाची पाळ फोडून तो नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही नगरसेवक सचिन राऊत यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून तलावाची दुरुस्ती करून घेतली होती. शेषनगर, ओमनगर, विद्यानगर आणि कब्रस्तान परिसरातील नागरिकांसाठी हा तलाव महत्त्वाचा जलस्रोत आहे. सध्या शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ऐन याच काळात महसूल अभिलेखात असा अचानक बदल होणे ही अत्यंत गंभीर आणि संशयास्पद बाब मानली जात आहे.
           नियोजन सभापती सचिन राऊत यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात गट क्रमांक ५२२ च्या जुन्या व नव्या महसूल अभिलेखांची तातडीने सविस्तर पडताळणी करण्यात यावी. 'तलाव' नोंद हटवून 'घरपड' नोंद कोणत्या फेरफार आधारे आणि कोणत्या सक्षम प्राधिकाराच्या आदेशाने करण्यात आली, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी. नोंद बदलण्यात अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. महसूल अभिलेखात वस्तुस्थितीनुसार 'तलाव' हीच नोंद त्वरित पुनर्स्थापित करण्यात यावी. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच नगर रचना विभागालाही पाठवण्यात आल्या असून, आता प्रशासन या 'डिजिटल' घोळावर काय कारवाई करते आणि बारई तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण ब्रम्हपुरी शहराचे लक्ष लागले आहे.

  Post Views:   832


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी