ने.हि. महाविद्यालयाच्या समीक्षा पंडीतचा राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत सहभाग
ब्रह्मपुरी/का.प्र.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत युवा संसद २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय येथील समीक्षा प्रकाश पंडित (एम.ए.प्रथम वर्ष भूगोल) हिने उल्लेखनीय यश मिळवले. या आधारे तिची निवड राज्यस्तरीय युवा स्पर्धेसाठी करण्यात आली होती.
युवा पिढीला सक्षम करणे आणि त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक समस्यावर चर्चा व वादविवाद करण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच राष्ट्र उभारणीत त्यांची भूमिका वाढवणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. एक देश एक निवडणूक या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत येणार्या महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत समीक्षा पंडित हिने हिरीरीने सहभाग नोंदविला, तिच्या या स्पष्ट विचारशक्ती व प्रखर वाणीने तिची २६ मार्चला विधान भवन, मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. तेथे जाऊन तिने आपले स्पष्ट विचार मांडून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
समीक्षाच्या यशाबद्दल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी तिचे भरभरुन अभिनंदन केले. तिच्या या यशाकरिता प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पदमाकर वानखडे, डॉ. दर्शना उराडे यांच्यासह महाविद्यालयातील सांस्कृतिक समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.