शिक्षण हा संवैधानिक अधिकार : पद्मश्री लक्ष्मण माने

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
‘‘कमी पटसंख्येचा बहाणा करून राज्य शासनाने राज्यातील जवळपास १४ हजार प्राथमिक शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचले आहे. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा कुटील डाव आहे. शासनाचे हे षडयंत्र सर्वशक्तीनिशी हाणून पाडले पाहिजे. शिक्षण हा प्रत्येकाचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, कारण शैक्षणिक क्रांतीतूनच सामाजिक क्रांतीचा मार्ग सुकर होतो.’’ असे बहुमोल विचार पद्मश्री तथा ‘उपरा’ हया जगप्रसिध्द आत्मकथेचे लेखक डॉ. लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीने आयोजित समारंभात अध्यक्ष पदावरून बोलत होते. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक लक्ष्मण यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रसंगी मंचावर समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष सुधीर अलोने, कोषाध्यक्ष के.जी. खोब्रागडे, सचिव डॉ. युवराज मेश्राम, नेताजी मेश्राम, छाया जांभुळे, सुधाकर पोपटे प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, ब्राम्हणवाद्यांनी बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात संघर्ष करून बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही मानवी मुल्ये शिक्षणाच्या माध्यमातूनच प्रत्यक्षात साकार होऊ शकतात. हीच मानवी मुल्ये राज्यघटनेचे अमूल्य अंग आहेत. म्हणून बहुजनांनी डॉ. आंबेडकरांचा आदर्श ठेवला पाहिजे. 
डॉ़  लक्ष्मण यादव यांनी सामाजिक क्रांतीचा इतिहास कथन केला. तथागत गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा फुले, संत रविदास यांचा वारसा पुढे नेत डॉ. आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवली. अर्थसंकल्पात शिक्षणासाठी २.६ टक्के एवढी अत्यल्प तरतूद करून शासनाने शिक्षणाची खिल्ली उडविल्याचा आरोप त्यांनी राज्यकर्त्यांवर केला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही डॉ. आंबेडकरांची शिकवण प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. अस्पृश्यांना जगण्याचे अधिकार डॉ. आंबेडकरांनी मिळवून दिले, याची आठवण त्यांनी करून दिली.
या प्रसंगी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना वन्यजीवांविषयी सेवाकार्याबद्दल रोख २५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक रामटेके यांनी केले. डॉ. युवराज मेश्राम यांनी संचालन तर सुधीर अलोने यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला श्रोतृवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

  Post Views:   24



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी