ब्रम्हपुरी तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
तालुक्यात विविध संस्था, शाळा व  सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
एल. एम. बी. पब्लिक स्कुल, ब्रम्हपुरी - येथे सोमवार दिनांक १४ एप्रिल २०२५ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. 
शाळेच्या वतीने प्राचार्य कादिर कुरेशी सर, उपप्राचार्य रश्मी राठी मॅडम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी - येथे बोधिसत्व, महामानव, दीन-दुबळ्यांचे कैवारी, थोर अर्थशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती  सोमवार, दिनांक १४ एप्रिल२०२५ रोजी मोठ्या उत्साह, अभिमान आणि आदरभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कपूर नाईक सर होते.  उपमुख्याध्यापक ए.डब्ल्यू. नाकाडे सर आणि पर्यवेक्षक पि.आर. जिभकाटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. नाईक सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बोरकर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कु. तुलेश्वरी बालपांडे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे, शिक्षकवृंदांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
चौगान - तालुक्यातील चौगान येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच तथा बौद्ध समाज चौगान यांच्या वतीने ‘भीम जन्मोत्सव उत्सव समतेचा' या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध गायक सुशांत मानकर आणि त्यांच्या संच यांनी सादर केलेल्या ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना' या बुद्ध-भीम गीतांच्या प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. 
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सह-उद्घाटक म्हणून चौगानचे सरपंच उमेश धोटे, अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रा. अंकुश मातेरे, तर उपाध्यक्ष म्हणून पत्रकार प्रा. संतोष पिलारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मयुर शिवणकर यांनी केले. चौगान ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, बौद्ध समाज आणि रमाई महिला मंडळ चौगान यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
नेवजाबाई हितकारिणी कन्या विदयालय, ब्रम्हपुरी - स्थानिक ने.ही. कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका बनपूरकर मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक निखारे सर, पर्यवेक्षिका खंडाते मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका दलाल मॅडम, हटवार मॅडम, बारेकर सर मंचावर उपस्थित होते.
       यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत श्री शिवूरकर सर व कु. हटवार मॅडम यांच्या चमू  ने सादर केले. प्रास्ताविकात ठेंगरी सर यांनी घराघरात संविधान पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका बनपूरकर मॅडम यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून अभ्यासाभिमुख बनण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठेंगरी सरांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन धोटे सर यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट, ब्रम्हपुरी - बोधिसत्व ,विश्वरत्न, भारतरत्न ,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख कान्वेंट आणि डॉ पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वंचित आणि वर्षानुवर्षापासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या विकासाचा मार्ग बाबासाहेबांच्या विचारातच आहे आणि म्हणून सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारून त्यावर कृती करून समाजाचा, राष्ट्राचा आणि मानव जातीचा कल्याण करण्यासाठी विचार करावा असे मार्गदर्शन  केले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्य मनिषा बगमारे, कॉलेजच्या प्राचार्या शारदा ठाकरे आणि सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सुभाषचंद्र खोब्रागडे यांनी तर उपस्थितांचे आभार गोवर्धन दोनाडकर यांनी मानले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रम्हपुरी - मा. सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर यांच्या निर्देशानुसार स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने १८ तास अभ्यास अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. 
डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदाचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी या अभियानाचे उद्घाटन केले. याप्रसंगी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ -१८ तास अभ्यास केला त्या पासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन १८ तास वाचनाचा नुसता संकल्पच नव्हे तर प्रत्यक्षात त्या संकल्पाला मूर्त रूप देऊ या असे भाष्य करून अभियानात स्वतः सहभागी होऊन विद्यार्थी आणि प्राध्यापकाना शुभेच्या दिल्या. 
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. उमेश हरडे यांनी केले.
विदर्भ इस्टेट -३ कॉलनी - येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानवाला  अभिवादन करण्यात आले, भीमजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धनंजय मेश्राम सर, उदघाटक मुन्नी शेंडे मॅडम, मार्गदर्शक अॅलड. आशिष गोंडाने, संजय वाळके सरउपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून प्रकाश लांजेवार सर, रतन चहांदे सर, प्रशांत मेश्राम सर, प्रविण बन्सोड सर, छन्ना खोब्रागडे सर, घनश्याम कुळमेथे सर, प्रमोद बन्सोड सर, प्रमोद बोरकर सर, सुमेध लोखंडे सर, गावलकर सर, कोचे सर, सतिश बागडे सर, हिरालाल चौधरी सर, संजय गावलकर सर मंचावर उपस्थित होते.
भिमजयंती निमित्त भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, तळ्यात- मळ्यात स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चमचा गोळी, संगीत खुर्ची, एकलव सामूहिक नृत्य, गीतगायन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्य स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

  Post Views:   78



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी