परवानाधारक दारू दुकानातून अवैध दारूची तस्करी!

   

ब्रह्मपुरी / महेश पिलारे 
     ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. यात मटका, जुगार, अवैध रेती तस्करी, चोऱ्या, आदींचा समावेश आहे. आता तर तालुक्यात परवानाधारक दारू विक्रेत्यांकडूनच नियमांना तिलांजली देत अवैध दारू विक्री सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
     ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक खेडेगावात अवैध धंद्यांना उधान आले आहे. अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाकडून कारवाया केल्या जात असल्या, तरी कारवायांना न जुमानता अवैध व्यवसायीक राजरोसपणे आपले धंदे चालवीत आहेत. त्यात जुगार, मटका, यांच्यासह अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. सद्यस्थितीत सरकारमान्य परवानाधारक दारू दुकानातून इतर ठिकाणी अवैधरित्या मद्य पाठविण्यात येत असल्याचे नागरिकांच्या चर्चेवरून समोर आले आहे. गांगलवाडी परिसरात येणाऱ्या हळदा, मुडझा, आवळगाव, गोगाव, तळोधी, वांद्रा, पवनपार आदी. नावाजलेल्या गावात अवैध धंदे व अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याचे कळते. सरकारमान्य परवानाधारक दारू दुकानातून इतर ठिकाणी अवैधरित्या मद्य पाठविण्यात हे तस्कर गुणवंत आहेत. सदर गांगलवाडी परिसरात अवैध रित्या मद्य पाठविण्याच्या कामात 'तिजा' नामक इसम कार्यरत असल्याचे सूत्रांकडून तसेच सुजान नागरिकांकडून कळते. सदर माहिती गांगलवाडी परिसरातील नागरिकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ब्रह्मपुरी समाचारच्या कार्यालयात येऊन दिली, हे विशेष. तसेच शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौगान, बेटाळा, अऱ्हेर नवरगाव आदी गावातही अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. चौगान गावात पाच अवैध मद्य विक्री करणारे व्यवसायिक असून चौकातच अवैध व्यावसायिकांद्वारे तळीरामांना मद्याची सोय केली जात असल्याचे कळते. अवैध व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, पोलीस प्रशासन दाखल होण्याच्या अगोदरच हे अवैध व्यावसायिक आपला मुद्देमाल मोठ्या शिताफिने गायब करतात. हे मात्र विशेष. यावरून अवैध व्यवसायिकांना कारवाईची कोण माहिती देते हे, न उकलणारे कोडे आहे. कितीही करावया केल्या तरी आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशाच अविभार्वात अवैध दारू विक्रेते व परवानाधारक दारू दुकानातून इतर ठिकाणी अवैधरित्या मद्य पाठविणारे तस्कर वागताना दिसत आहेत. 
     हा मद्य प्रवास पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रातून डोळ्यादेखत सहिसलामत कसा सुटतो याचेच अनेकांना आश्चर्य आहे. शहर व तालुक्यात परवानाधारक देशी दारूचे जाळे पसरलेले आहे. या दुकानांतून पिण्याकरीता नव्हे तर अवैध विक्रीकरीता मद्य विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. परवानाधारक दारू दुकानांमधुन गाव खेड्यात अवैध व्यवसायिकांकडे पुरवठा केला जातो. अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांची माहिती परवानाधारकडे असते. मात्र कधी कधी एखाद्या अवैध मद्य विक्री करणारा गोत्यात आलाच, तर एकतर्फी कारवाईला त्याला समोर जावे लागते. त्यामुळे परवानाधारक मद्य विक्री करणारा व्यवसायिक खरंच आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे काय? परवानाधारक विक्रेत्याकडून अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणार्‍या परवानाधारकांवर कारवाई होणार का? असे एक नव्हे अनेक प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहेत. 21 वर्षाखालील मुलांना मद्य देऊ नका असाही एक नियम आहे. पण, या नियमाची पायमल्ली केली जात आहे. आजचे अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन भविष्य बरबाद करीत आहेत. पोलिस प्रशासन व जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन अवैध दारू विक्रेते व परवानाधारक दारू दुकानातून इतर ठिकाणी अवैधरित्या मद्य पाठविणाऱ्या त्या गुणवंतांवर व त्यांना प्रोत्साहन देणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

  Post Views:   590




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी