वैनगंगेच्या पात्रात पार्टी बेतली जीवावर; दोन युवक बेपत्ता, ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथील घटना

   

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी : 
           मित्रांसोबत नदीकाठी पार्टी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धक्कादायक घटना १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथे घडली. शुभम विजय सहारे (१९) आणि शुभम पुष्पराज बगमारे (२४) अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत.
          गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरकाडा गावातील ७ ते ८ मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर गेले होते. जेवणाचा बेत नदीच्या पलीकडे असलेल्या कोंढाळा बाजूला आखण्यात आला. सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास परतत असताना पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात काही मित्रांनी आंघोळीचा मोह आवरता आला नाही.
         शुभम सहारे, शुभम बगमारे यांच्यासह राज सहारे आणि गौरव वाघधरे हे चौघेही आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र, या ठिकाणी खोल डोह असल्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही आणि चौघेही बुडू लागले. यावेळी उपस्थित इतर मित्रांनी प्रसंगावधान राखून राज आणि गौरव या दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र दोन्ही 'शुभम' पाण्यात बुडू लागले.
         घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. १ मार्च रोजी सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले, परिणामी मोहीम थांबवावी लागली. आज, २ मार्च रोजी सकाळपासून स्थानिक मच्छिमार आणि प्रशासनाच्या मदतीने पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

  Post Views:   603




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी