ब्रह्मपुरीच्या महिलेची लाखांदूरमध्ये निर्घृण हत्या; चिमुरडीच्या डोळ्यादेखील आईचा गळा चिरला, परिसरात खळबळ

   

ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी :
        लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच नात्यातील दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. स्वतःच्या पोटच्या चिमुरडीसमोरच आईचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
            मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी तुळसीदास अंबादे (वय ३० वर्ष, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी, २६ एप्रिल रोजी माधुरी या आपली मुलगी आणि संशयित आरोपी गौरव अंबादे (रा. ब्रह्मपुरी) याच्यासह पालांदूर येथील एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. लग्नावरून परतताना उशीर झाल्याने त्यांनी रात्री घरी न जाता भागडी येथील नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.
            पहाटेच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जानवी हिच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाजामुळे घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, संशयित आरोपी गौरव अंबादे हा घाईघाईने त्याच्या दुचाकीवरून पळून जात असल्याचे त्यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता माधुरी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.
          आरोपीने माधुरी यांचे तोंड उशीने दाबून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. धक्कादायक म्हणजे त्यांचे पाय स्कार्फने बांधलेले होते. शरीरावर इतर ठिकाणीही गंभीर जखमा आढळल्या आहेत. पोटच्या मुलीसमोरच घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे उपस्थित सुन्न झाले.
              घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी गौरव अंबादे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या हत्येमागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

  Post Views:   3366


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी