ब्रम्हपुरीत अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, खर्रा आणि ७ मिक्सर मशिन्स जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

   

ब्रम्हपुरी :
            महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि खर्रा विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ब्रम्हपुरी येथील वडसा रोडवरील एका पान सेंटरवर छापा टाकून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हजारो रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि खर्रा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ७ मिक्सर मशिन्स जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पान सेंटर मालकाविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी मे.नि. फाळके हे पंच आणि शासकीय साक्षीदार उ. मा. कापगते यांच्यासह ब्रम्हपुरी येथील वडसा रोडवर, गाडगे बाबा मंदिर व युनियन बँकेच्या जवळ असलेल्या एका 'पान सेंटर, टी स्टॉल आणि कोल्ड्रिंक्स सेंटर' येथे लॅपटॉप व बॅटरी संचलित प्रिंटरसह तपासणीसाठी पोहोचले. तेथे तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीसाठी प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला. यात इगल हक्का शिक्षा टोबॅको (Eagle Hookah Shisha Tobacco) एकूण ३ पॅकेट्स (किंमत २५५/- रुपये), बाबा १२० प्रीमियम च्युइंग टोबॅको (Baba 120 Premium Chewing Tobacco) ०१ डब्बा (किंमत ७९०/- रुपये), तयार खर्रा अंदाजे ४ किलो साठा (अंदाजे किंमत ४,०००/- रुपये). यातील ३.५ किलो खर्रा जप्त करण्यात आला असून, ५०० ग्रॅम साठा विश्लेषणासाठी (Lab Testing) नमुना म्हणून घेण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मिक्सर मशिन्स ७ मिक्सर मशिन्स (एकूण किंमत २८,०००/- रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत. जनस्वास्थ आणि जनआरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम १८ अन्वये ही यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
            अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ओळख विचारली असता, तेथे हजर असलेल्या व्यक्तीने आपले नाव धनेश रंजन राखडे (वय ३३ वर्षे, रा. खंडाळा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर) असे सांगितले. आपणच याचे मालक व विक्रेता असल्याची कबुली त्याने दिली. आरोपीने हा प्रतिबंधित साठा कुठल्या पुरवठादाराकडून आणला आणि तो कोणाला पुरवणार होता, हे अद्याप उघड केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी ग्राहक, पुरवठादार आणि उत्पादकापर्यंत तपास होणे आवश्यक आहे.
             अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसूचना क्रमांक असुमाअ/अधिसूचना/411/2025/७, दिनांक १८/०७/२०२५ (तसेच १७/०७/२०२५ चे आदेश) अन्वये जनतेच्या आरोग्यासाठी गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीच्या विक्री व साठवणुकीवर राज्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सुगंधी तंबाखू आणि खर्राच्या सेवनाने कर्करोग (कॅन्सर), मुखरोग आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतात हे माहीत असूनही आरोपीने केवळ आर्थिक फायद्यासाठी हा साठा केला होता.

 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाईची शक्यता
          अन्न सुरक्षा अधिकारी मे.नि. फाळके यांच्या फिर्यादीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपी धनेश रंजन राखडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या कलम ३(१)(झेडझेड)(iii), २६(१), २६(२)(iv), २७(३)(c), ३०(२)(A) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये जर या आरोपीविरुद्ध अशा प्रकारचे एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचे आढळून आल्यास, त्याच्याविरुद्ध मकोका (MCOCA) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची शिफारस अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या धडक कारवाईमुळे ब्रम्हपुरी परिसरातील अवैध तंबाखू आणि खर्रा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

  Post Views:   3174


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी