चकबोथली येथे समता सैनिक दलाचा वर्धापन दिन साजरा
ब्रम्हपुरी/का.प्र.
समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना वाहून घेतलेल्या समता सैनिक दलाचा वर्धापन दिन चकबोथली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विहार मेश्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन करत समता सैनिक दलाच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकला. समता सैनिक दलाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
समता सैनिक दल ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आली होती. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कार्य करणार्या या संस्थेने स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून विहार मेश्राम यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, समता सैनिक दल ही केवळ एक संस्था नाही, तर सामाजिक न्यायाच्या लढाईतील एक सशक्त चळवळ आहे. आजच्या तरुणांनी समतेच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक परिवर्तनात सक्रीय सहभाग घ्यायला हवा. कार्यक्रमाला उपस्थित मातेरे सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. या वर्धापन दिन सोहळ्यात गावातील नागरिक, युवक, महिला तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत समता सैनिक दलाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.