२०२४ पूर्वीची अनाधिकृत लेआऊट नियमाकुल होणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
   

ब्रम्हपुरी/महेश पिलारे
      
        शेतकर्‍यांच्या शेतातील पांदण रस्ते जोपर्यंत मोकळे होणार नाहीत, तोपर्यंत शेतकरी सुखी आणि समृद्ध होणार नाही. म्हणून महायुती सरकार शेतकर्‍यांसाठी बळीराजा मुख्यमंत्री पांदण रस्ते योजना लवकरच सुरू करणार आहे. तसेच सरकारी जागेवरील २०११ पूर्वीचे अतिक्रमणाचे पट्टे वाटपाचे काम सरकारने हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ९० टक्के लेआउट अनाधिकृत आहेत. म्हणूनच १५ ऑक्टोंबर २०२४ पूर्वीचे अनाधिकृत लेआऊट आता नियमाकुल होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत आयोजित शासकीय पट्टे वााटप कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.  
     महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग ब्रम्हपुरीच्या वतीने तहसिल कार्यालय परिसरात शासकीय पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री (म.रा), चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, नागपूर पश्चिमचे माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
      पुढे बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ब्रम्हपुरी तालुक्यातील २४५४ लाभार्थ्यांना विविध योजनेतंर्गत लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महसूल अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. पट्टे वाटप करीत असतांना सरकारी अधिकार्‍यांनी सनद चे पैसे जनतेकडून वसूल न करता, डीपीसी कडून वसुल करा, तसेच ब्रम्हपुरी येथील मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी संगणमताने सरकारी जागेवर अधिवास करणार्‍या लोकांचा प्लेन टेबल करून सर्वे करा व त्यांना पट्टे वितरीत करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिले.
    ब्रम्हपुरी तालुक्यात ९० टक्के लेआऊट अनाधिकृत आहेत, असे १५ ऑक्टोंबर २०२४ पूर्वीचे अनाधिकृत लेआऊट आता नियमाकुल होणार आहेत, तसेच १ कोटी लोकांचे मानीव पद्धतीने रेगुलेशन करण्याचे निर्णय घेतले असल्याची तसेच औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्रातील शहरापासून १ किमी अंतरावरील एसडीओ कडून सनद संपवित असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. सध्या स्थित वन डिस्ट्रीक्ट, वन रजिस्ट्री योजना सुरू आहे, आता सेवा हमी कायदा अंतर्गत वन स्टेट, वन रजिस्ट्री योजना राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना खरचं कर्जमाफीची गरज आहे, त्याचेच कर्जमाफी करण्यात येणार आहे. तसेच २.५ कोटी लाडक्या बहिनींना पुढील पाच वर्ष लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच पुढील पाच वर्ष शेतकर्‍यांना कृषी वीज बिल माफ करण्यात आले आहे. शासकीय कामात कामचूकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही. याउलट चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांना यशोचित सन्मानीत करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
         प्रसंगी माजी आमदार अतुल देशकर यांनी अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान भरपाईची मा. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आहे. तसेच शासनाने पट्टे वितरीत करतांना २०११चे निकष वाढविणे गरजेचे असून झुडपी जंगल तसेच वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणाचे पट्टे वितरीत करण्याची मागणी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.  
       चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, २०११ पूर्वीचे अतिक्रमण धारकांना पट्टे वितरीत करण्याचा धाडसी व क्रांतिकाराी निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. आमदार विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण गावभर पट्टे मिळवून दिल्याचे होर्डिंग्ज लावले. आमदार विजय वडेट्टीवार यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतांना, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतांना त्यांनी अतिक्रमण धारकांना पट्टे का वितरीत केले नाही? आमदार विजय वडेट्टीवार यांनी अतिक्रमणधारकांना पट्टे मिळविण्यासाठी केलेले पत्रव्यवहार दाखवावे, व पत्रव्यवहार केले असल्यास होर्डिंग्जवर लावावे? आमदार विजय वडेट्टीवार यांना गावभर होर्डिंंग्ज लावले आहेत, परंतु जनतेचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही, असा टोला प्रसंगी लगावला. महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनस दिला नाही, कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापले, मात्र महायुतीच्या सरकारने शेतकर्‍यांना हेक्टरी २० हजार रूपये बोनस दिला, आणि शेतकर्‍यांना कृषी पंपाचे वीज बिल माफ केले. सरकार शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार असल्याचे भांगडीया यांनी सांगितले. 
       प्रसंगी अतिक्रमण धारकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, नागपूर पश्चिमचे माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी , उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटिलयांच्या हस्ते पट्टयांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन जगदिश मेहेर यांनी केले. प्रास्ताविक उपिवभागीय अधिकारी पर्वनी पाटील यांनी तर आभार मंडळ अधिकारी बोधे यांनी केले. प्रसंगी तालुक्यातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

  Post Views:   1190




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी