नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर कोर्धा जवळ भीषण अपघात
बोंडेगाव आणि विरलीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, ६ जण जखमी
ब्रह्मपुरी :
नागभीड ते ब्रह्मपुरी रस्त्यावरील कोर्धा गावाजवळ १९ सप्टेंबरच्या रात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. एका चारचाकी गाडीला (MH 31 CD 9189) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरच्या रात्री चारचाकी वाहन नागभीडकडून ब्रह्मपुरीच्या दिशेने जात होते. कोर्धा गावाजवळ आल्यावर एका अज्ञात वाहनाने या गाडीला जोरदार धडक दिली आणि वाहनचालक तेथून पसार झाला. धडक इतकी भीषण होती की, चारचाकी गाडीचा मोठा चक्काचूर झाला. या अपघातात नितीन उर्फ मिथुन विनायक भर्रे (वय ३७, रा. बोंडेगाव वार्ड, ब्रह्मपुरी) आणि श्रावणी हिमेश बेदरे (वय १२, रा. विरली, जि. भंडारा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने बोंडेगाव आणि विरली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातातील जखमींमध्ये बोंडेगाव (ब्रह्मपुरी) येथील वैष्णवी नितीन भर्रे (वय ३२ वर्ष), आरूहू नितीन भर्रे (वय ४ वर्ष),निव्या नितीन भर्रे (वय १.५ वर्ष) तसेच विरली (लाखांदूर, जि. भंडारा) येथील मैथूला हिमेश बेदरे (वय ३५ वर्ष), हिमेश बंडू बेदरे (वय ४० वर्ष), शौर्य हिमेश बेदरे (वय १० वर्ष) यांच्या समावेश आहे.
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.