अनिता लांबे यांचे "चरैवेति" विषयावर प्रेरणादायी भाषण
ब्रह्मपुरी/का.प्र.
नव संवत्सराच्या शुभारंभाने कार्यपथावर अविरत वाटचाल "चरैवेति, चरैवेति" हा मंत्र कार्यकर्त्यांसाठी केवळ एक विचार नाही, तर त्यांची जीवनपद्धती असली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समिति च्या विदर्भ प्रांत धार्मिक विभाग प्रमुख अनिता लांबे यांनी वर्ष प्रतिपदा उत्सवात केले.
त्यांनी आपल्या उद्बोधनात संस्कृतीचा सातत्यशील प्रवाह, संघटनात्मक कार्याची वाटचाल आणि भविष्यातील दिशा या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ऐतरेय उपनिषदातील "चरैवेति" हा मूलमंत्र म्हणजेच निरंतर गतिशीलता दर्शवतो. निसर्गातील सूर्य, चंद्र, ऋतू कधीही थांबत नाहीत, तसेच कार्यकर्ता देखील आपल्या ध्येयाकडे अविरत वाटचाल करायला हवी. त्या म्हणाल्या की, वं. मावशी आणि वं. ताईंनी एका छोट्या शाखेपासून सुरु केलेल्या कार्याचा आज विविध आयामांत विस्तार झाला आहे. आणीबाणीतील संघर्ष, कोरोना काळातील सेवा कार्य आणि प्रत्येक प्रांतात निर्माण झालेली संघटनात्मक ताकद यामुळे समितिची कार्यव्याप्ती मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे.
संघटन कार्य हे केवळ एका पिढीचे नसून, अनेक पिढ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिणाम आहे. नदी जशी आपल्या उगमापासून समुद्रापर्यंत वेगवेगळे रूप घेत पुढे प्रवाहित होत राहते, पण तिचे प्रवाहत्व, शुद्धता आणि लोककल्याणाची भावना कायम राहते, तसेच संघटनेनेही युगानुकूल बदल स्वीकारून ध्येयाकडे वाटचाल करावी. ‘तेजस्वी हिंदू राष्ट्र निर्माण' हे आपले अंतिम ध्येय असून, बदलत्या काळातील आव्हाने पेलत आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून कार्यरत राहणे हीच खरी सेवा आहे. असे आव्हान त्यांनी सेविकांना केले.
याप्रसंगी विदर्भ प्रांत धार्मिक विभाग प्रमुख अनिता लांबे यांनी जिल्हा व नगर कार्यकारीणीतील दायित्व बदलाची घोषणा केली. संस्कृत श्लोक अपर्णा पाठक, अमृत वचन कु. देवयानी पाठक , प्रास्ताविक व परिचय ममता भट आणि वैयक्तिक गीत कु.आर्या परांडे यांनी सादर केले.