वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार , दोन जखमी
ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी तालुक्यात अपघातांचे प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. विनापरवाना वाहन चालक आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवीत आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात अपघात घडून येत आहेत. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात चालक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 मे 2025 ला दुपारी 12.30 वाजता च्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा गावाच्या फाट्याजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील रहिवाशी येशुदास नीलकंठ चंदनबावणे वय 18 हा आपल्या घरच्या दुकानातील किराणा माल पुरवठा करायला त्यांच्या चारचाकी मालवाहक गाडी क्रमांक एम. एच. 34 बी. झेड. 7352 ने बाहेरगावी जात होता. त्याच्यासोबत त्याचे दोन सहकारी छगन भास्कर शेंडे वय 35 राहणार गेवरा, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर, निकेश दशरथ प्रधान वय 20 राहणार बरडकिन्ही, तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर हे होते. चालक येशूदास नीलकंठ चंदनबावणे यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी मालवाहक वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविले. त्यामूळे चारचाकी मालवाहक वाहनावरील चालक येशुदास याचे नियंत्रण सुटल्यामुळे वांद्रा फाट्या जवळील उभे असलेल्या झाडाला वाहनाने ठोस मारली. अपघात एवढा भीषण होता की, यात चालक येशुदास नीलकंठ चंदनबावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत वाहन चालक मृताक येशुदास नीलकंठ चंदन बावणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविला आहे. अपघातातील छगन भास्कर शेंडे व निकेश दशरथ प्रधान यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ ब्रह्मपुरी शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मृतक चालक यशोदास नीलकंठ चंदनबावने याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे कळते. वृत्त लिहेपर्यंत सदर घटनेची ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.