जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर
जिल्हा परिषद सर्वसाधारण ०३, ना.मा.प्र.०२
ब्रम्हपुरी/का.प्र.
ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. गाववाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या पंचायत समिती सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सोमवारला तहसिल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे काढण्यात आली. यातून ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी पर्वनी पाटील व तहसीलदार सतिश मासाळ यांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी पंचायत समिती सदस्य पदासाठी आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक राजकीय पुढारी, इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे पंचायत समिती सदस्य पदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक कामाला लागले. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या पंचायत समिती गणामध्ये सदस्य पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काहीजणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले. तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील ०५ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर एकही जागा महिलांसाठी राखीव नाही.
मागील तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. ब्रम्हपुरी तालुक्यातील ०५ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात नान्होरी - अर्हेर नवरगाव - ना. मा. प्र. सर्वसाधारण, मालडोंगरी - पिंपळगांव - ना. मा. प्र. सर्वसाधारण, खेडमक्ता - चौगान - सर्वसाधारण, मेंडकी - गांगलवाडी -- सर्वसाधारण, आवळगाव - मूडझा -- सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
यापूर्वी ब्रम्हपुरी पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली, त्यात सभापती पद हे सर्वसाधारण आहे. पंचायत समितीच्या १० गणांसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत सोमवारला काढण्यात आली. यात नान्होरी - अनुसूचित जाती (सर्वसाधारण) , अर्हेर नवरगाव - सर्वसाधारण (महिला), पिंपळगांव - सर्वसाधारण, मालडोंगरी - सर्वसाधारण, खेडमक्ता - ना.मा.प्र., चौगान - सर्वसाधारण, गांगलवाडी - ना.मा.प्र. (महिला), मेंडकी - अनुसूचित जमाती (महिला) , आवळगाव - सर्वसाधारण (महिला), मूडझा - सर्वसाधारण (महिला) असे ब्रम्हपुरी पंचायत समितीच्या १० गणांसाठी आरक्षण आहे.