ब्रम्हपूरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बेलगाव जानी येथील बेपत्ता तीन मुलींचा लावला शोध!
ब्रम्हपूरी /प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजा बेलगाव जानी येथील दोन अल्पवयीन जुळ्या बहिणींसह शेजारी राहणारी २१ वर्षीय तरुणी अशा तिघी जणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रम्हपूरी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत या तिन्ही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फिर्यादी तुषार सुभाष देशपांडे (रा. बेलगाव जानी) यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती की, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या दोन १७ वर्षीय जुळ्या बहिणी आणि शेजारी राहणारी २१ वर्षीय मुलगी अशा तिघी शेतात गेल्या होत्या. मात्र, रात्र होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. एकाच वेळी तीन मुली बेपत्ता झाल्यामुळे गावात अपहरणाची भीती व्यक्त केली जात होती. अज्ञात आरोपीने काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून या मुलींना पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला होता.
तक्रार प्राप्त होताच ब्रह्मपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा (अप.क्र. ११२/२६) दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपूत आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शोध पथक तयार करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकार, पोहवा विजय ब्राह्मणे, महिला पोलीस अंमलदार दिपाली कळंबे व इतर कर्मचारी पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे वेगाने तपास चक्रे फिरवून तिन्ही मुलींचा शोध घेतला. सुदैवाने, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच तिन्ही पीडितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकार करीत आहेत. ब्रम्हपूरी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका मोठ्या संकटाचे सावट टळले असून, परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.