रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू; पद्मापूर चक जंगलातील घटना

   

ब्रम्हपुरी:
            दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भुज उपक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मौजा पद्मापूर चक जंगलाला लागून असलेल्या कुरण गट क्र. २१ मध्ये रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणावर वन्यप्राण्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. अनिल भास्कर दिवटे (वय ३० वर्ष, रा. बल्लारपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली.
              मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील रहिवासी असलेले अनिल दिवटे हे आज दुपारच्या सुमारास पद्मापूर चक जंगलालगत असलेल्या कुरण क्षेत्रात रानभाजी गोळा करण्यासाठी गेले होते. ते भाजी गोळा करत असतानाच, दबा धरून बसलेल्या एका हिंस्त्र वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, अनिल यांचा जागीच मृत्यू झाला.
           घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळावर मृतदेहाची तपासणी करून सविस्तर मौका पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यादरम्यान मृत अनिल यांच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दातांच्या व नख्यांच्या गंभीर जखमा आढळून आल्या, तसेच वन्यप्राण्याने हल्ला केला त्या जागेवर त्यांचा रानभाजीचा थैलाही पडलेला आढळून आला. मानेवरील जखमांवरून हा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.
         घटना अत्यंत संवेदनशील असल्याने ब्रम्हपुरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. मौका पंचनामा करताना एम. बी. गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव), ब्रम्हपुरी वनविभाग, ए. व्ही. सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), दक्षिण ब्रम्हपुरी, एस. एम. लोणारे क्षेत्र सहाय्यक, भुज, व्ही. एम. आदे नियतक्षेत्र वनरक्षक,पद्मापूर उपस्थित होते. यासोबतच स्थानिक पोलीस कर्मचारी आणि वनविभागाचे इतर कर्मचारीही उपस्थित होते.
          घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह उत्तरपत्रिकेसाठी (शवविच्छेदनासाठी) ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित भागात हिंस्त्र प्राण्याचा माग काढण्यासाठी आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे (Trap Cameras) आणि लाईव्ह कॅमेरे (Live Cameras) बसवण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचाऱ्यांमार्फत या भागात दिवसरात्र नियमित गस्त (Patrolling) वाढवण्यात आली आहे. वन प्रशासनाने स्थानिक नागरिकांना जंगलात किंवा जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  Post Views:   695


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी