ब्रह्मपुरीत ख्रिस्तानंद विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

   

ब्रह्मपुरी:
         स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार, १३ फेब्रुवारी पासून विद्यालयासमोर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चौकात बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
         आंदोलनस्थळी शिक्षक आमदार सुधाकर अडबले, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, माजी आमदार अतुल देशकर, शिवसेना प्रमुख भूषण रामटेके आणि डॉ. मिलिंद भणारे यांनी भेटी दिल्या. नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून, प्रशासकीय स्तरावर यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
         पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. यात पगाराची (Basic, DA, HRA) विभागणी न करता संपूर्ण पगाराची नोंद पगारबुकावर व्हावी. तसेच, महागाईच्या तुलनेत योग्य पगारवाढ मिळावी. ग्रॅज्युएटीची रक्कम शेवटच्या संपूर्ण पगारावर आधारित असावी आणि EPF कपात मूळ पगाराच्या 12% प्रमाणे जमा करावी.शासन निर्णयानुसार मिळणाऱ्या किरकोळ, वैद्यकीय व अर्जित रजा घेण्याची मुभा असावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे व त्याची लेखी प्रत द्यावी.शुल्लक कारणावरून 'शो-कॉज' नोटीस देणे, कामावरून काढण्याची धमकी देणे आणि मोबाईल बंदीची सक्ती करणे यावर तत्काळ रोक लावावी.
         जोपर्यंत शाळा प्रशासन मागण्यांची लेखी स्वरूपात पूर्तता करत नाही, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे शालेय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"आम्ही मागील पाच-सहा महिन्यांपासून शाळा प्रशासनाला निवेदने देत आहोत, मात्र अद्याप समाधानकारक लेखी उत्तर मिळालेले नाही. प्रशासनाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून अखेर आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे."
— आंदोलक कर्मचारी

  Post Views:   2491




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी