भर लग्नमंडपातून नववधूच्या पर्समधून लाखांच्या भेटवस्तू चोरीला
ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी शहरात गुन्हेगारीच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ होत आहे. अवैध व्यवसाय, घरफोडी, चोरी यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, ब्रम्हपुरी पोलिसांनी वेळीच या प्रकरणांवर आळा घालणे आवश्यक आहे. तालुक्यात व शहरात भुरट्या व अट्टल चोरट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरट्यांनी आनंदाचा लक्ष असलेल्या लग्नसमारंभ कार्यक्रमाला सुद्धा गालबोट लागेल असे कृत्य केले आहे. लग्न मंडपातून अज्ञात चोरट्यांनी नववधूची हँन्डबॅग चोरून २.५ लक्ष रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी येथील राजू कवडूजी कुथे वय ५५ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे गडचिरोली येथील पोलीस दलातील निवृत्त पोलीस हवालदार आहेत. फिर्यादी राजू कुथे यांच्या मुलीचे लग्न दिनांक ०४/०६/२०२५ नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आयोजीत करण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर फिर्यादी कुथे यांच्या साळ भावाची मुलगी कु.करीश्मा मुन्ना प्रधान रा. किन्ही ही करवली म्हणून फिर्यादी कुथे यांच्या मुलीजवळ होती. फिर्यादी कुथे यांनी लग्नामध्ये येणारे पैसे व मोबाईल हे तिच्या जवळ ठेवण्यासाठी दिले होते. दुपारी २.३० वा.चे दरम्यान कु.करीश्मा प्रधान हीचे जवळ ठेवलेले फिर्यादी कुथे यांच्या मुलीची पैसे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी कुथे यांनी शोध घेतला असता, पर्स व मोबाईल सापडला नाही. अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेल्या हॅन्डबॅग मध्ये पाहण्याने लग्नात दिलेले लिफाफ्यामध्ये ठेवलेले अंदाजे १.५ लक्ष रुपये व अॅप्पल आयफोन १६ प्रो. २५६ जिबी कंपनीचा मोबाईल कि. १ लक्ष रूपये असा एकूण २.५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला.
याबाबत फिर्यादी राजू कुथे यांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.