चौगाण प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव
मद्यपी जमावाकडून धिंगाणा आणि शासकीय कामात अडथळा
ब्रम्हपुरी :
ब्रह्मपुरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, चौगाण येथे कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांन मद्यपी जमावाकडून धक्काबुक्की व धमकवल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णाला उपचारासाठी आत जाऊ न देण्याच्या उद्देशाने गेट बंद करून तब्बल अडीच तास दहशत माजवण्यात आली. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चौगाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अनघा रमेश उंदीरवाडे (वय ३०) या कार्यरत आहेत. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून त्यांची २४ तासांची ड्युटी होती. त्यांच्यासोबत आरोग्य सेविका सुवर्णा चौधरी आणि सफाई कामगार संजना चहांदे यादेखील उपस्थित होत्या. रात्रीच्या सुमारास (अंदाजे ८:०५ वाजता) वंदना दादाजी अर्जुनकार (वय ६०) या महिला चक्कर आल्याने व वाढलेल्या शर्करा (शुगर) पातळीमुळे उपचारासाठी आरोग्य केंद्रात आल्या. ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचारासाठी सहकाऱ्यांना निर्देश दिले आणि स्वतः औषध निर्माण अधिकाऱ्यांसह रात्री ८:२३ वाजता आरोग्य केंद्रात दाखल झाल्या.
वैद्यकीय अधिकारी पोहचल्या तेव्हा आरोग्य केंद्राचा मुख्य गेट खुला होता, परंतु आतील चॅनल गेट १० ते १२ जणांच्या जमावाने दुपट्याने (कापडाने) बांधून बंद केला होता. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णाकडे जाण्यापासून रोखण्यात आले. "आमचा पेशंट थकला किंवा दगावला तरी चालेल, पण तुम्हाला आत जाऊ देणार नाही," अशी दमदाटी करत मद्यधुंद अवस्थेतील लोकांच्या तोंडावाटे उग्र वास येत होता.
जमावाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि मद्यपींच्या धिंगाण्यामुळे आरोग्य केंद्रात अत्यंत असुरक्षित व भीतीदायक वातावरण निर्माण झाले. डॉ. अनघा उंदीरवाडे यांनी आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी ‘११२’ वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाच्या गोंधळामुळे संपर्क होऊ शकला नाही. रात्री १०:३० वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर परिस्थिती हाताळत रुग्णावर उपचार करण्यात आले आणि प्रकृती सुधारल्यानंतर रात्री १०:५० वाजता कर्मचाऱ्यांनी रुग्णास सुरक्षित घरी पोहोचवले. याप्रकरणी विचारणा केली असता, आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांनी
शिवाजी पत्रे, प्रफुल अर्जुनकार, रत्नाकर मेश्राम, मयूर देवघडे, रुपेश अर्जुनकार, शिवम कुंभारे, दादू मेघराज पत्रे व अंबादास अशोक देवारी सर्व रा. चौगाण इसमांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. अनघा उंदीरवाडे यांनी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२६(२), १८९(१)(अ), १८९(१)(इ), १८९(२), १९०, २२१, ३२९(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.