मेंडकीत अन्न अन् औषध प्रशासनाची 'सर्जिकल स्ट्राईक'! कोटरंगे पान सेंटरवर धाड; प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त, 'मकोका'अंतर्गत कारवाईचा इशारा!

   

ब्रह्मपुरी :
          राज्य शासनाने कडक बंदी घातलेली असतानाही छुप्या मार्गाने प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि सुगंधी तंबाखू विकणाऱ्या अवैध व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आपला बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील 'मे. कोटरंगे पान सेंटर'वर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरातील गुटखा आणि तंबाखू माफियांचे पार धाबे दणाणले आहेत.
           मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी मेघा निवृत्तीराव फाळके यांनी पंच अतुल श्यामराव डोमळे यांच्यासह ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:१० वाजताच्या सुमारास मेंडकी येथील 'मे. कोटरंगे पान सेंटर' येथे लॅपटॉप व बॅटरी संचलित प्रिंटरसह अचानक भेट दिली. तेथे हजर असलेल्या व्यक्तीला शासकीय ओळखपत्र दाखवून त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव रोशन देविदास कोटरंगे (वय ३६ वर्षे, रा. मेंडकी, ता. ब्रह्मपुरी) असे सांगून स्वतःला पेढीचा मालक व विक्रेता असल्याचे कबूल केले.
            अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पान सेंटरची पंचांसमक्ष कसून तपासणी केली असता, तेथे महाराष्ट्र शासनाने उत्पादित, साठवणूक आणि विक्रीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित केलेला मुद्देमाल विक्रीसाठी ठेवलेला आढळला. यात पानमसाला (सिग्नेचर) किंमत २९६/- रुपये, सुगंधी तंबाखू (१०८ मजा) किंमत ८५५/- रुपये, सुगंधी तंबाखू (ईगल) किंमत ८९०/- रुपये, पानमसाला (डायरेक्टर) किंमत २००/- रुपये, पानमसाला (राजश्री)किंमत १७०/- रुपये, पानमसाला (विमल) किंमत ९०/- रुपये असा एकूण २५०१/- रुपये किमतीचा संपूर्ण प्रतिबंधित साठा विश्लेषणासाठी अनौपचारिक नमुना म्हणून जप्त करण्यात आला आहे.
               मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसूचना क्रमांक असुमाअ/अधिसूचना/८६६/२०२६/७ (दिनांक १३ जुलै २०२६) अन्वये राज्यात गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधी तंबाखू आणि सुपारीच्या निर्मिती, साठवणूक व विक्रीवर २० जुलै २०२६ पासून एका वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हे पदार्थ खाल्ल्याने कर्करोग (कॅन्सर), मुखरोग व प्रजननावर गंभीर परिणाम होतात हे माहीत असूनही आरोपी रोशन कोटरंगे याने केवळ आर्थिक फायद्यासाठी हा माल साठवला होता.
            आरोपीने हा प्रतिबंधित साठा कुठल्या मुख्य पुरवठादाराकडून आणला आणि तो कोणाला विकणार होता, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या गुटखा रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य उत्पादक आणि पुरवठादाराचा शोध पोलीस घेत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी मेघा फाळके यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात आरोपी रोशन कोटरंगेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ३(१)(zz)(iv) व ५९ अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
          तपासामध्ये आरोपीविरुद्ध अशा प्रकारचे एकापेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्याचे किंवा संघटित टोळीचा सहभाग आढळून आल्यास आरोपीवर 'मकोका' (MCOCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा प्रशासनाने दिला आहे. या धाडसत्रामुळे छुप्या मार्गाने गुटखा विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  Post Views:   1804


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी