२२ वर्षांपासून पत्नीवर प्राणघातक हल्ला करून फरार असलेला आरोपी ब्रह्मपुरी पोलिसांच्या जाळ्यात

नागपुरातून गजाआड
   

ब्रह्मपुरी :
            पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तब्बल २२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात फरार आरोपी अखेर ब्रह्मपुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रमेश झिंगूजी खानोरकर (रा. कूर्झा, हल्ली मुक्काम नरसाळा, जि. नागपूर) असे या जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ नाव आणि ओळख लपवून लपतछपत जगणाऱ्या या आरोपीला नागपुरातून शिताफीने अटक करण्यात आली आहे.
            सन २००४ मध्ये ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कलम ३०७, ३२६ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी रमेश खानोरकर हा तेव्हापासूनच फरार झाला होता. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले होते. ब्रह्मपुरी पोलीस गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने त्याचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
          नुकतीच ब्रह्मपुरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली की, नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील मौजा नरसाळा येथे मागील काही वर्षांपासून एक इसम एकटाच राहत आहे, ज्याच्याकडे कोणतीही नातेवाईक येत-जात नाही. या माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी अत्यंत गुप्त व हुशारीने पडताळणी केली. तपासणीअंती हा इसम इतर कोणी नसून २२ वर्षांपूर्वी पत्नीला संपवण्याचा प्रयत्न करणारा फरारी आरोपी रमेश खानोरकरच असल्याची खात्री पटली. गेल्या २२ वर्षांपासून तो आपली खरी ओळख लपवून नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील नरसाळा येथे वास्तव्यास होता.
            आरोपीला पोलिसांच्या हालचालींचा सुगावा लागू नये म्हणून अत्यंत खबरदारी बाळगत काल दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ब्रह्मपुरी पोलिसांनी नरसाळा येथील त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी अचूक सापळा रचून अचानक छापा टाकला आणि त्यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि. मनोज खडसे, पो.हवा. मुनेश गजबे, मिलिंद नैताम, पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ठ रंगारी यांच्या पथकाने पार पाडली.

  Post Views:   1914


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी