तलावात बुडून इसमाचा मृत्यु
ब्रम्हपुरी-
ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे एक इसम तलावात बुडून मृत पावल्याची घटना आज दि.१५ ऑगष्ट २०२५ ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्हेर नवरगाव येथील रहिवासी अरुण तुळशीराम ठेंगरे वय ५३ वर्ष हा व्यक्ती दि.१४ ऑगष्ट २०२५ ला सकाळी ४ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे गावा बाहेरील तलावाच्या पाळीवर शौचास गेला होता. मात्र दिवसभर घरी न आल्याने त्याचा कुटुंबीयांच्या वतीने त्याचा शोध घेण्यात आला. मात्र अरुण चा शोध लागला नाही. दि.१५ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गावाजवळील तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तलावात मृतदेह आढळून आल्याने गावात एकाच खळबळ उडाली. ब्रह्मपुरी पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले. ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आला.
मृतक अरुण हा घरचा कर्ता व्यक्ती असल्याने ठेंगरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुले व बराच आप्त परिवार आहे.