डायल ११२ चा खेळखंडोबा! ब्रम्हपुरीत शुल्लक कारणांसाठी पोलिसांना पाचारण; अतिउत्साही नागरिकांमुळे खाकी वर्दी त्रस्त

दोनच वाहने, रेल्वे फाटक आणि जंगलव्याप्त गावांचे आव्हान; विनाकारण कॉल करणाऱ्यांवर ताशेरे
   

ब्रम्हपुरी/ महेश पिलारे :
           आणीबाणीच्या काळात नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी शासनाने 'डायल ११२' ही हायटेक सेवा सुरू केली. मात्र, ब्रम्हपुरी तालुका आणि शहरात या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. किरकोळ वाद, दारू पिऊन होणारा धिंगाणा अशा शुल्लक कारणांसाठीही नागरिक थेट 'डायल ११२' वर कॉल करून पोलिसांना घटनास्थळी बोलवत आहेत. नागरिकांच्या या अतिउत्साहामुळे आणि विनाकारण दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे ब्रम्हपुरी पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येत असून, मूळ गुन्ह्यांच्या तपासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
         'डायल ११२' ही यंत्रणा थेट राज्याच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी (Emergency Response Center) जोडलेली असून जीपीएस (GPS) तंत्रज्ञानावर काम करते. गंभीर गुन्हे, अपघात, महिला व बालकांवरील अत्याचार, किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शहरात १० ते १५ मिनिटांत तर ग्रामीण भागात १५ ते ३० मिनिटांत मदत पोहोचवणे हे या यंत्रणेचे मुख्य काम आहे. परंतु, ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये याच्या अगदी उलट घडताना दिसत आहे. केवळ रात्री-अपरात्री दारू पिऊन धिंगाणा घालणे, घरातील किरकोळ कौटुंबिक वाद किंवा अगदी शुल्लक कारणांसाठीही पोलीस मदतीचा गैरवापर केला जात आहे. विशेष म्हणजे, भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, पोलीस पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला, तरी नागरिक नियंत्रण कक्षात वारंवार कॉल करून तक्रारींचा पाऊस पाडतात.
         एकीकडे विनाकारण येणाऱ्या कॉल्सची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील संसाधनांची व कर्मचार्यांची कमतरता ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. पोलीस ठाण्यात लोकसंख्येला पूरक इतकी पोलिस कर्मचार्यांची संख्या नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत पोलीस ठाण्यात दळणवळणासाठी केवळ दोनच शासकीय वाहने उपलब्ध आहेत. अशा मर्यादित पोलिस कर्मचारी व संसाधनांमध्ये संपूर्ण तालुक्याचा भार सांभाळताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. तालुक्यामध्ये हळदा, मुडझा, एकारा, आवळगाव, रामपुरी यांसारखी दुर्गम आणि जंगलव्याप्त गावे आहेत. या भागांमध्ये एखादी खरी आणीबाणीची घटना घडल्यास, मर्यादित वाहनांमुळे ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचणे पोलिसांना अशक्य होते. त्यातच खोट्या तक्रारींमुळे वाहने व्यस्त राहिल्यास खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होतो. ब्रम्हपुरी शहरांतर्गत एखाद्या वॉर्डात घटना घडल्यास पोलिसांना अनेकदा बंद रेल्वे फाटकाचा सामना करावा लागतो. यामुळे वाहने खोळंबून राहतात आणि वेळेवर पोहोचण्यात अडचणी येतात.
        नागरिकांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे ब्रम्हपुरी पोलिसांना नियमित गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करणे, गस्त घालणे आणि इतर प्रशासकीय कामे करणे कठीण झाले आहे. आपत्कालीन सेवा ही गंमत नसून, ती कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी असू शकते, याचे भान नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. 'डायल ११२' वर येणाऱ्या प्रत्येक कॉलची आणि संभाषणाची माहिती थेट रेकॉर्ड होते. त्यामुळे जुने जमिनीचे वाद, किंवा सामान्य तक्रारींसाठी पोलीस स्टेशनमध्ये जावे. विनाकारण कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा वेळ वाया घालवणाऱ्या अशा उपद्रवी नागरिकांवर आता कठोर कायदेशीर ताशेरे ओढण्याची वेळ आली आहे._

  Post Views:   648


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी