ब्रह्मपुरीत पुढील ४ दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा!
नानोरी पंप हाऊस येथील गाळ उपसा कामामुळे तात्पुरता बदल; नागरिकांना काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
ब्रह्मपुरी :
शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या नानोरी पंप हाऊस येथील जॅकवेल आणि इंटेकवेल परिसरात साचलेला गाळ उपसण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या तांत्रिक कामामुळे पाणी उपसा करण्याच्या प्रक्रियेवर तात्पुरता परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून ब्रह्मपुरी नगर परिषदेने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनात महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार पुढील अंदाजे ४ दिवस शहरात एक दिवसाआड (आलटून-पालटून) पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नानोरी येथील जॅकवेल आणि इंटेकवेल भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाणी उपसा करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. भविष्यात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी हा साचलेला गाळ काढणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नगर परिषदेमार्फत हे काम सध्या वेगाने पूर्ण केले जात आहे. पुढील अंदाजे ४ दिवस (काम पूर्ण होईपर्यंत) शहराच्या विविध भागांत एक दिवसाआड पाणी सोडण्यात येईल. पाणी उपसा प्रक्रियेतील संथ गतीमुळे पाण्याचा दाब काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे.
"नानोरी पंप हाऊस येथील गाळ उपसा करण्याचे काम तातडीने पूर्ण केले जात आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरते नियोजन करण्यात आले आहे. या काळात शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या गरजेनुसार पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा अपव्यय टाळून अत्यंत काटकसरीने वापर करावा. तसेच या तात्पुरत्या बदलासाठी ब्रह्मपुरी नगर परिषदेला सहकार्य करावे," असे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.