ब्रह्मपुरीचे डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांची जागतिक पातळीवर उत्तुंग भरारी
रशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा गौरव
ब्रह्मपुरी / महेश पिलारे:
वैद्यकीय क्षेत्रात भारताची मान जागतिक स्तरावर पुन्हा एकदा उंचावली आहे. मॉस्को, रशिया येथे 'रशियन स्कूल ऑफ कोलोरेक्टल सर्जन' (RSCS) द्वारे आयोजित १६ व्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोलोरेक्टल सर्जरी परिषदेत ब्रह्मपुरी येथील लाडूकर हॉस्पिटलचे प्रसिद्ध जनरल आणि कोलोरेक्टल सर्जन डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत विशेष ठसा उमटवला आहे.
या महत्त्वपूर्ण परिषदेला जगभरातून १५०० हून अधिक प्रतिनिधी आणि ३१ आंतरराष्ट्रीय संघटना उपस्थित होत्या. या जागतिक मंचावर डॉ. लाडूकर यांना निमंत्रित प्राध्यापक म्हणून विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी या परिषदेत "रेक्टोव्हॅजायनल फिस्टुला: माझा दृष्टिकोन" (Rectovaginal Fistula: My perspective) या क्लिष्ट आणि संवेदनशील विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांच्या या संशोधनाला आणि अनुभवातून मांडलेल्या दृष्टिकोनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांकडून उस्फूर्त दाद मिळाली.
परिषदेच्या उद्घाटन समारंभात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ज्ञान, कौशल्य यांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि कोलोरेक्टल सर्जरीच्या अधिक प्रसारासाठी 'ब्रिक्स' (BRICS) देशांमधील कोलोरेक्टल सर्जननी मैत्री करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या 'आयएससीपी' (ISCP) संघटनेचे अध्यक्ष म्हणून डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यासोबत सचिव डॉ. नीरज गोयल, उपाध्यक्ष डॉ. शांती वर्धनी आणि डॉ. विकास जैन उपस्थित होते. याच वेळी ISCP आणि RSCS या दोन मोठ्या संस्थांमध्ये सामंजस्य करार (MOU) देखील करण्यात आला.
डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी या संशोधनाचा सखोल अभ्यास करून ते जागतिक स्तरावर मांडण्यात आणि वैद्यकीय लेख तयार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी देखील अमेरिकेच्या जगप्रसिद्ध 'डीसीआर' (Diseases of the Colon & Rectum) या नियतकालिकात मूळव्याध उपचाराच्या भारतीय पद्धतीचा गौरव करण्यात आला होता, ज्यामध्ये डॉ. लाडूकर यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख झाला होता.
ग्रामीण आणि निमशहरी भागातून येऊन वैद्यकीय संशोधनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवणारे डॉ. लाडूकर यांचे हे यश थक्क करणारे आहे. ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जगतात आपली ओळख निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे केवळ चंद्रपूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जागतिक पटलावर कोरले गेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.