ब्रम्हपुरीत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने; 'नीट' पेपरफुटीच्या निषेध मोर्चावरून जोरदार राडा!

   

ब्रम्हपुरी :
           देशभरात गाजत असलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पेपरफुटीप्रकरणी खोटी व चुकीची माहिती पसरवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत ब्रम्हपुरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपचा हा मोर्चा स्थानिक काँग्रेस कार्यालयावर धडकल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
         भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहर व तालुका स्तरावरील सुमारे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयापर्यंत विरोध मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या निदर्शनाचा निषेध नोंदवणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश होता. मात्र, हा मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आक्रमकपणे कार्यालयासमोर जमा झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत त्यांना 'बेशरमाचे झाड' भेट देण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला.
            मोर्चादरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भाजपकडू "राहुल गांधी हाय-हाय!" च्या घोषणा देत राहुल गांधींच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. तर काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर देत "चंदा चोर गद्दी छोड!" आणि "पेपर लीक करणाऱ्या सरकारचा निषेध असो!" अशा आक्रमक घोषणा देण्यात आल्या. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप युवा मोर्चावर वरचढ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तरीही भाजपने मोर्चाचा शेवट होईपर्यंत आपली निदर्शने व घोषणाबाजी सुरूच ठेवली.
          आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने आणि वातावरण तापल्याने प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर मोर्च्या मुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दिल्लीत आधीपासूनच नीट पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचे आंदोलने सुरू आहेत. त्यातच २० तारखेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. कालच दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या वतीने याविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेला हा राडा सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. उद्या दिनांक २३ जुलै ला काँग्रेस व वंचित पक्षाच्या वतीने ब्रम्हपुरी बंद चे आयोजन करण्यात आले आहे.

    विद्यार्थ्यांच्या नावावर देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेस आणि इंडी आघाडीचा कुटील डाव आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई होऊन त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. पोलिसांवर हल्ले, महिला पत्रकारांचा छळ आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणारे हे डॉक्टर होऊ पाहणारे विद्यार्थी नसून देशविघातक प्रवृत्तीचे लोक आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या काँग्रेस व इंडी आघाडीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

- तनय देशकर, 
जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर


   शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षा प्रकरणातील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील अन्याय तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणारे काॅंग्रेस नेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंकाजी गांधी, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तालुका/शहर काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी यांच्या वतीने उद्या तीव्र जनआंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आमची काँग्रेस कार्यालय येते मीटिंग सुरू असताना भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत मोर्चा परतून लावला.

   खेमराज तिडके 
    तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी

  Post Views:   1243


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी