नगर परिषद ठेकेदाराची पथविक्रेत्यांकडून अवैध वसूली

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
नगर परिषद हद्दीतील जून्या नगर परिषद इमारती जवळ भरणार्‍या आठवडी बाजार व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भाजी व फळ विक्रेत्याकडूनच वसुलीचे अधिकार ठेकेदाराला दिले असतांना, पथविक्रेत्यांकडून सुद्धा बळजबरीने वसूली केली जात आहे. या संदर्भात फुटपाथ असोसिएशन संघटनेने तीव्र निषेध नोंदविला असून नगर परिषद प्रशासनाला सदर वसूली थांबविण्याविषयी निवेदन दिले आहे.
नगर परिषद प्रशासनाने जाहीर लिलावाची सूचना दि. ११/०३/२०२५ ला प्रसिध्द केली. त्यानुसार प्रारंभिक बोली ३ लाख रूपये ठेवण्यात आली. दि. १८/०३/२०२५ला वडसा येथील शरीफ अ. करीम शेख यांना वसूलीचा ठेका ४ लाखाच्या बोलीवर देण्यात आला. यामध्ये बाजार चौक येथील आठवडी बाजार व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गुजरी विक्रेत्याकडून वसूलीचे अधिकार देण्यात आले. मात्र ठेकेदाराने नियमांचे उल्लंघन करून नगर परिषद हद्दीतील फुटपाथ विक्रेत्यांकडून सुद्धा बळजबरीने वसूली करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. प्रति विक्रेता २० रूपये या प्रमाणे अतिरिक्त वसूली करण्यात येत आहे. निविदेतील तरतूदीचा भंग करून नियमबाह्य वसूली करण्याचे काम सुरू आहे. वसूली न दिल्यास दुकान बंद पाडू अशी धमकी पथ विक्रेत्यांना देण्यात येत आहे. हा प्रकार खंडणी वसूल करण्याचा म्हणावा लागेल.
आज किमान पथविक्रेत्यांची संख्या १०० गृहीत धरली तरी प्रतिदिन प्रतिविक्रेता २०रूपये प्रमाणे ठेकेदाराला २०००रूपये नियमबाह्य वसूली प्राप्त होते. महिन्याकाठी किमान ६० हजार व वर्षअखेर अंदाजे ०७ लाख एवढी रक्कम ठेकेदाराच्या घशात जाणार आहे. ठेकेदारावर एवढी मेहरबानी कुणाची व कशासाठी याबद्दल खमंग चर्चा जनमानसात रंगत आहे. एवढी किमान वसूलीच्या लिलावाची प्रारंभीक बोली फक्त ३ लाख असावी, हे संयुक्तीक मुळीच वाटत नाही. यामध्ये नक्कीच गौडबंगाल आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही ह्या रजेवर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.

  Post Views:   26



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी