प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर प्रकरणी २८ वर्षीय तरुणावर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल
ब्रम्हपुरी पोलिसांकडून आरोपीला अटक
ब्रम्हपुरी :
तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी त्याच गावातील एका २८ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
ब्रम्हपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्याच गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची भनक मुलीच्या पालकांना लागल्यानंतर त्यांनी यापूर्वीच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपी तरुणाने प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अनैतिक संबंधातून सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रम्हपुरी पोलिसांनी पूर्वीच्या तक्रारीमध्ये सुधारणा करत भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), (I), (M) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ यांसारख्या अत्यंत गंभीर कलमांची वाढ केली. ब्रम्हपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संबंधित २८ वर्षीय आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक साखरकर मॅडम अधिक तपास करीत आहेत.