चौगानच्या सुपुत्राचा एमपीएससीमधून यशस्वी प्रवास
विकीकुमार दाणी लिपीक पदावर नियुक्त
ब्रम्हपुरी/का.प्र.
जिद्द, सातत्य आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा आधार घेत चौगान गावचा सुपुत्र आणि गावाचा अभिमान, विकीकुमार अंताराम दाणी याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (श्झ्एण्) माध्यमातून त्याची विभागीय सह-निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, नागपूर विभाग येथे लिपिक पदावर निवड झाली आहे.
विकीकुमारच्या या यशामुळे चौगान गावात आनंदाची लहर पसरली असून, गावकर्यांनी त्याचे भरभरून अभिनंदन केले आहे. त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्याने सिद्ध केले आहे की चिकाटी, निष्ठा आणि कठोर परिश्रमांमुळे कोणतेही उद्दिष्ट गाठता येते.
चौगान गाव हे सर्वाधिक कर्मचारी, सैनिक, उच्चशिक्षित नागरिक आणि सामाजिक चैतन्यामुळे प्रसिद्ध आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वी गावातील तरुणांनी एकत्र येत किरायाच्या खोलीत 'महात्मा फुले स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र' सुरू केले. हे केंद्र २४ तास खुले असून, आज त्यातून घडलेले विद्यार्थी विविध शासकीय आणि निमशासकीय पदांवर कार्यरत आहेत – प्राथमिक शिक्षक, भारतीय सेना, अग्निवीर, ण्Rझ्इ, आरोग्य विभाग, मंत्रालय लिपिक इत्यादी आहेत.
विकीकुमार दाणी यानेही याच अभ्यास केंद्रातून प्राथमिक तयारी करत त्याचे शिक्षण पूर्ण करत स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच जिद्दी आणि ध्येयवेडा असलेला विकीकुमार हा गायनाचीही आवड बाळगतो. शालेय जीवनात त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. घराजवळ असलेल्या अभ्यासिकेमुळे विकीकुमारच्या मनात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निर्माण झाली. त्याने पदवीचे शिक्षण घेत असतानाच परीक्षेची तयारी सुरू ठेवली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्याने आज हे यश गाठले आहे.‘स्वप्न सत्यात उतरवणारा एक प्रयत्नशील युवक’ अशी ओळख निर्माण करणार्या विकीकुमार दाणी याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी चौगान ग्रामस्थांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.