नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर विलास गजपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

नागभीड-ब्रम्हपुरी परिसरावर शोककळा
   

ब्रम्हपुरी :
            नागभीड आणि ब्रम्हपुरी परिसरातील वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत परिचित अन् आदरणीय व्यक्तिमत्त्व, नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर विलास होमराजजी गजपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवार, २४ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
           डॉ. विलास गजपुरे हे केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने आणि सामाजिक बांधिलकीतून नागरिकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक, सोनार समाजाचे माजी अध्यक्ष आणि होमिओपॅथी अकॅडेमी ब्रम्हपुरीचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडल्या. सामाजिक असो वा सार्वजनिक, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
           त्यांच्या निधनाची बातमी पसरताच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे सहकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने गजपुरे परिवाराच्या दुःखात सहभागी झाले असून सर्वांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. डॉ. गजपुरे हे प्रमोद गजपुरे यांचे छोटे बंधू, तर कैलास, सतीश, संजय व शेखर गजपुरे यांचे मोठे भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा मोठा परिवार आहे.

उद्या निघणार अंत्ययात्रा
         डॉ. विलास गजपुरे यांच्या पार्थिवावर मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता ब्रम्हपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  Post Views:   497


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी