मुडझात 'कर्मवीर विद्यालया'च्या छताचा भाग कोसळला!
जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
ब्रह्मपुरी :
ज्या शाळेत आपण आपल्या मुलांना मोठ्या आशेने, सुरक्षित भविष्यासाठी पाठवतो, तीच शाळा जर त्यांच्या जिवावर उठली तर? असाच एक अंगावर काटा आणणारा प्रकार काल ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा येथे घडला.
झाले असे की, काल २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुडझा भागात अचानक वाऱ्यासह धुवांधार पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे येथील 'कै. भिवाजी चन्ने शिक्षण संस्था नागभीड'च्या ची ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील 'कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय' या शाळेच्या इमारतीचे छत भसाभसा खाली कोसळले. दैव बळवत्तर म्हणून, ज्यावेळी छताचा भाग पत्त्यांसारखा कोसळला, त्यावेळी वर्गात मुले नव्हती! नाहीतर काय अनर्थ घडला असता, विचार करूनही अंगावर काटा येतो. एखादी मोठी दुर्घटना घडली असती आणि निष्पाप मुलांचा जीव गेला असता. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, प्रशासनाला प्रत्येक वेळी अशाच एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा असते का?
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर विद्यालयाची ही इमारत सन १९६९ मध्ये बांधण्यात आली आहे. सदर इमारतीत ५ ते १२ वी पर्यंत शाळा आहे. आज तब्बल ५७ वर्षे झाली, तरी या जीर्ण इमारतीत शाळा भरवली जात आहे. 'इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे, ती कधीही कोसळू शकते,' अशी पूर्वकल्पना स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी शाळा प्रशासनाला एक-दोनदा नव्हे, तर वारंवार दिली होती. पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाळेचे संस्थाचालक, प्राचार्य आणि शाळा व्यवस्थापन समिती या सगळ्यांनी पालकांच्या या गंभीर इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. डोळ्यांवर झापडे ओढून बसलेल्या या प्रशासनाला जणू काही घडणारच नाही असा आव आणायचा होता.
इतकी मोठी धक्कादायक घटना घडल्यानंतरही शाळा प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. प्रशासनाची ही थंड आणि 'बघ्याची' भूमिका पाहून मुडझ्यातील गावकऱ्यांचा आणि पालकांचा संताप आता अनावर झाला आहे. "आम्ही आमची मुले शिकून मोठी व्हावीत म्हणून शाळेत पाठवतो, की त्यांच्या जिवाला मुकण्यासाठी?" असा थेट आणि संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. या अत्यंत धोकादायक आणि जीर्ण इमारतीमध्ये लहान लहान मुलांना बसवणे म्हणजे थेट त्यांच्या जिवाशी खेळ मांडण्यासारखेच आहे.
आज सुदैवाने मुले वर्गात नव्हती, पण उद्या जर काही बरे-वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? ते संस्थाचालक की डोळे मिटून बसलेले प्रशासन? पालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. या इमारतीचे तात्काळ 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात यावे, मुलांच्या शिक्षणासाठी ताबडतोब पर्यायी आणि सुरक्षित व्यवस्था करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, हीच आता संपूर्ण मुडझावासीयांची एकमुखी मागणी आहे. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी थेट आपला मोर्चा शाळेकडे वळवून प्राचार्य तथा शिक्षकांना जाब विचारला. घटनास्थळी गट शिक्षणाधिकारी विद्या शेळके यांनी भेट दिली असून निर्लेखीकरणचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले. घटना घडल्यानंतर एक दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा संस्था चालकाने साधी भेट सुद्धा शाळेची व पालकांची घेतली नाही. त्यामुळे पालकात आणि नागरिकात संस्थाचालका विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सदर शाळा इमारत सन १९६९ साली निर्माण झालेली असून ती सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. या गंभीर बाबतीत मी स्वतः संस्थेचे सचिव श्री. टीकाराम ठाकरे यांना प्रत्यक्ष फोन (कॉल) केला असता, त्यांनी माझ्या फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. संस्था सचिवांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट न दिल्यास संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल, अशी कडक तंबी त्यांना देण्यात आली. या तंबीनंतर त्यांनी उद्या सकाळी ११:०० वाजता प्रत्यक्ष भेट देण्याचे मान्य केले आहे. संस्थेकडून दाखवण्यात आलेला हा प्रकार अत्यंत बेजबाबदार व हलगर्जीपणाचा आहे. त्यामुळे मी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल व प्रस्ताव शिक्षणाधिकारी (EO) साहेबांकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवणार आहे.
विद्या शेळके गट शिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी
आमच्या शाळेत बाहेरगावचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे, घटनेच्या दिवशी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना लवकर सुट्टी देण्यात आली होती. ही जुनी इमारत अचानक कोसळेल असा असा अंदाज नव्हता. परंतु, काल अचानक झालेल्या तीव्र वादळ व मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली.संस्था सचिव यांना इमारतीच्या दुरावस्थेबाबत कळविले असता त्यांनी सर्रास दुर्लक्ष केले. हो नंतर बघू असे संस्थासचिव टीकाराम ठाकरे उत्तर देतात.
प्राचार्य इ. डी. समर्थ कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय मुडझा