अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने अल्पवयीन बालक जागीच ठार
ब्रह्मपुरी/का. प्र.
रेती घाटावर ट्रॅक्टर ट्रॉलीत रेती भरणाऱ्या मजुरांना नाश्ता देऊन परतणाऱ्या अल्पवयीन बालकाच्या अंगावरून भरधाव वेगाने ट्रॅक्टर गेल्याने अल्पवयीन बालक जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 26 मे 2025 सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास अऱ्हेर नवरगाव - चिखलधोकडा रेतीघाट येथे घडली.
फिर्यादी विकास तुळशीराम बट्टे राहणार अऱ्हेर नवरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून, अऱ्हेर नवरगाव गावातील ट्रॅक्टर चालक नितेश रामचंद्र राऊत वय 24 याने फिर्यादीचा पुतण्या श्रीकांत रामलाल बट्टे वय 15 वर्षे यास रेती घाटावरील मजुरांना नाश्ता नेऊन देण्यासाठी आपल्या दुचाकी वरून अऱ्हेर नवरगाव चिकलधोकडा घाटावर नेले. घाटावरून परत येत असताना, ट्रॅक्टर चालक नितेश रामचंद्र राऊत वय 24 याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 सी जे 8180 हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविले. त्यामुळे ट्रॅक्टर वर बसलेला अल्पवयीन मुलगा श्रीकांत रामलाल बट्टे हा उसळून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. ट्रॅक्टर अंगावरून गेल्यामुळे अल्पवयीन बालक श्रीकांत रामलाल बट्टे याच्या गुप्तांगाला मार लागला. अल्पवयीन बालकास ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
फिर्यादी विकास बट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी नितेश रामचंद्र राऊत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 106 (1) मोटार वाहन कायदा 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेमुळे अऱ्हेर नवरगाव परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.