रुद्रापूर रिठ शिवारात वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी
ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाची दहशत कायम
ब्रम्हपुरी :
तालुक्यातील कळमगाव येथील रहिवासी असलेले ५५ वर्षीय शेतकरी बुधाजी सितकुरा मांदाळे यांच्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास बुधाजी मांदाळे हे रुद्रापुर रिठ (गट क्रमांक ५०) येथील स्वतःच्या शेतात काम करत होते. दरम्यान, शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात मांदाळे यांच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला वाघाने जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी शेतकरी बुधाजी मांदाळे यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी बुधाजी मांदाळे यांची भेट घेतली. त्यांनी जखमीच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबत सविस्तर माहिती घेतली.
सतत होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांमुळे कळमगाव व लगतच्या परिसरातील शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. शेतात कामावर जाणेही आता धोक्याचे ठरत असल्याने वनविभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी तीव्र मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.