माजी नगराध्यक्ष रीताताई उराडे यांची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी

माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकासह अनेकांची भाजपात घरवापसी
   

ब्रह्मपुरी :-
        ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष रिताताई दीपक उराडे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रीताताई उराडे यांच्यासह त्यांचे पती प्रसिद्ध उद्योजक दीपक उराडे, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट, माजी नगरसेवक सुधीर राऊत, राहुल ठेंगरी, डॉ. सौरभ लांजेवार यांच्यासह अनेकांनी  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम वरोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता.
      

  महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी वरोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयोजित केलेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर वरोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष रीताताई उराडे, प्रसिद्ध उद्योजक दीपक उराडे, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तूपट, माजी नगरसेवक सुधीर राऊत, राहुल ठेंगरी, डॉ. सौरभ लांजेवार, प्रज्वल निकुरे, गणेश धनंजुळे, शांतनु लाखे, चेतन खेते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून घरवापसी केली. यावेळी आमदार करण देवतळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजप नेते कृष्णा सहारे, ब्रम्हपुरी नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सचिन अकुलवार, राजू मामा मिश्रा यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
       रीताताई उराडे ह्या पूर्वी सन २०१४-१६ या अडीच वर्षांच्या काळात भाजपाच्या ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होत्या. त्यानंतर त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. सन  २०१९ - २०२४ ह्या काळात ब्रह्मपुरी नगर परिषदेत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. परंतु सध्या स्थितीत राजकीय समीकरणे पाहता, त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत, भाजप पक्षात घर वापसी केली आहे. केंद्रात भाजप व राज्यात भाजप प्रणित आघाडी सरकार असल्यामुळे व काँग्रेसमधील अकार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी भाजप पक्षात प्रवेश तर केलं नाही ना अशी चर्चा जनमानसात आहे. काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडली आहे.

  Post Views:   1505



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी