ब्रम्हपुरी-चांदगाव मार्गावर अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, ५ गोवंशांची सुटका!
वाहनासह ५.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
ब्रम्हपुरी :
रस्त्याने एक पिकअप गाडी भरधाव वेगाने जात होती. वरून ताडपत्रीने नीट झाकलेली, त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्याला आत काय आहे याचा अंदाज येणे कठीणच. पण, पोलिसांना मिळालेली एक पक्की बातमी आणि त्यांनी वेळेवर रचलेला सापळा... यामुळे अवैध गोवंश वाहतुकीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे!
ब्रम्हपुरी-चांदगाव मार्गावरील दुपारे लॉन्ससमोर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. यात ५ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडण्यात आले आहे. गोष्ट आहे १७ ऑक्टोबरच्या रात्रो १० वाजताची. पोलीस अंमलदार निलेश तुमसरे आणि त्यांचे सहकारी पथक परिसरामध्ये गस्त घालत होते. त्याच वेळी एका खबऱ्याकडून पोलिसांना अत्यंत गुप्त बातमी मिळाली. चांदगावच्या बाजूने ब्रम्हपुरीकडे एका पांढऱ्या रंगाच्या 'महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक' (क्र. MH 36 AA 2966) मधून गोवंशाची अत्यंत निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
बातमी मिळताच पोलिसांनी जराही वेळ न गमावता दोन पंचांना सोबत घेतले आणि ब्रम्हपुरी-चांदगाव रस्त्यावरील दुपारे लॉन्ससमोर नाकाबंदी करून सापळा रचला. थोड्याच वेळात संशयित गाडी तिथे आली. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवली आणि तपासणी सुरू केली. गाडीचा मागचा भाग हिरव्या ताडपत्रीने घट्ट झाकला होता. पोलिसांनी जेव्हा ती ताडपत्री बाजूला केली, तेव्हा आतले दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. त्या छोट्याशा वाहनात १ गोऱ्हा आणि ४ गायी अशा एकूण ५ प्राण्यांना अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवले होते. प्राण्यांना साधे हालचाल करायलाही जागा नव्हती. प्रवासात त्यांच्यासाठी चारा तर दूरच, पण पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही सोय केली नव्हती. जेव्हा पोलिसांनी गाडीतील लोकांकडे वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही.
पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला. यात ४५,००० रुपये किमतीचे ५ गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण ५,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यात वाहनचालक श्यामु कुसन मालाधरे (वय २८ वर्ष, रा. बोडेगाव, ता. ब्रम्हपुरी), कुसन केवल मालाधरे (वय ६६ वर्ष, रा. बोडेगाव, ता. ब्रम्हपुरी),राजकुमार नथ्थु मनघटे (वय ५५ वर्ष, रा. करझखेडा, जि. भंडारा) यांचा समावेश आहे.
सुटका करण्यात आलेल्या या ५ गोवंशांना सुरक्षिततेसाठी आणि योग्य देखभालीसाठी तातडीने हळदा येथील 'गोविंद गोशाळेत' हलवण्यात आले आहे.पोलीस अंमलदार निलेश तुमसरे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (ड),११(१) (इ),११ (१) (फ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ आणि भारतीय न्याय संहितेच्या ३(५) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.