ब्रम्हपुरीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगवे खिंडार; मेंडकी सेवा सहकारी संस्थेवर भाजपचा ऐतिहासिक विजय!

   

माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात 'किसान सहकार विकास पॅनल'ची बाजी; १३ पैकी ८ जागा जिंकून काँग्रेसची सत्ता उलथवून लावली

ब्रम्हपुरी / का. प्र. :
         तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या आणि सर्वात मोठी संस्था असलेल्या मेंडकी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या (रजि.नं. ७७४) सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढणाऱ्या भाजप प्रणीत 'किसान सहकार विकास पॅनल'ने १३ पैकी ८ जागा जिंकून काँग्रेस प्रणीत पॅनलचा धुव्वा उडवला आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली काँग्रेसची विजयी परंपरा खंडित केली.
           ही निवडणूक ब्रम्हपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. काँग्रेस प्रणीत 'शेतकरी विकास पॅनल' आणि भाजप प्रणीत 'किसान सहकार विकास पॅनल' यांच्यात थेट लढत झाली. भाजपच्या या विजयाचे शिल्पकार म्हणून माजी तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. यशवंत आंबोरकर यांनी व्यूहरचना आखली होती. प्रा. अतुल देशकर यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा या विजयात मोठा वाटा राहिला.
       भाजप प्रणीत आघाडीने एकूण १३ पैकी ८ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. विजयी उमेदवारांमध्ये महिला राखीव गटातून वंदना अरुण शेंडे आणि  अरुणा रामकृष्ण दिघरे, 
सर्वसाधारण गटातून रवींद्र खटू गुरनुले, पुरुषोत्तम गोपाळा ठाकरे, कवडू शालीकराम आंबोरकर, युवराज मारोती ढोरे, सुधाकर गणपत महाडोरे आणि प्रकाश रामचंद्र ठाकरे यांचा समावेश आहे.
            हा विजय खेचून आणण्यासाठी राजेंद्र दिवाकर आंबोरकर, राजेंद्र दादाजी आंबोरकर, सचिन गुरनुले, चिंतामणजी जेलेवार, विष्णूजी गुरनुले आणि कृष्णाजी बोरुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
          या ऐतिहासिक विजयाबद्दल राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार अशोक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, जिल्हा सचिव साकेत भानारकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दिवटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे व नेतृत्वाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
"हा विजय म्हणजे सामान्यांच्या विश्वासाचा विजय आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— प्रा. अतुल देशकर (माजी आमदार)

  Post Views:   707


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी