ब्रम्हपुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शेतातील मोटारपंप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ पंप जप्त

   

ब्रम्हपुरी/ महेश पिलारे 
          शेतात पाणी भरण्यासाठी नदीघाटावर लावलेले मोटारपंप चोरणाऱ्या अट्टल चोरांना जेरबंद करण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे ४ मोटारपंप हस्तगत केले आहेत.
            दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनेगाव येथील रहिवासी सोमेश्वर श्रीराम दर्वे यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या शेतातील सिंचनासाठी नदीवर लावलेला मोटारपंप अज्ञात चोराने नट-बोल्ट काढून चोरून नेला आहे. या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११६/२०२६, कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
            गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) मनोज खडसे आणि डी.बी. पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. सोनेगाव शेतशिवारात दोन व्यक्ती मोटारपंपातील तांबे काढून पंप लपवून ठेवत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. अनिल रामाजी मैंद (रा. सोनेगाव), राजू साहदेव चावने (रा. सोनेगाव) या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन ब्रह्मपुरी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्यांनी सोनेगाव नदीघाटावरील ३ एच.पी. चा मोटारपंप चोरल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, त्यांनी सोनेगाव येथील आणखी दोन आणि बेटाळा परिसरातील नदीनाल्यातील एक असे एकूण ४ मोटारपंप चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
          सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपूत आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सपोनी मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ट रंगारी, प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांचा समावेश होता. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

  Post Views:   2000




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी