शालेय पोषण आहार योजनेचे वाजले तीन-तेरा

दोन महिन्यांपासून योजनेतील तांदळाचा पुरवठा बंद
   



ब्रम्हपुरी/महेश पिलारे
केंद्र शासनाने वर्ग १ली ते ८वी पर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार ही योजना सुरू केली. परंतु विगत ०२ महिन्यांपासून शाळेला तांदळाचा पुरवठा बंद असल्यामुळे सदर योजनेचे तीन-तेरा वाजले की काय असा प्रश्न निर्माण झााला आहे. शाळा व्यवस्थापन सतत सक्षम अधिकार्‍यांच्या संपर्कात असून देखील तांदळाचा पुरवठा सुरू झाला नाही. परिणामी विद्यार्थी तथा पालक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
विद्यार्थ्यांचे निट पोषण झाले पाहिजे, गळती थांबून उपस्थिती वाढली पाहिजे, शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे या उदात्त हेतूने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू  केली. या योजनेअंतर्गत वर्ग १ ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना अन्न शिजवून खावयास घालण्याचे काम शाळेतंर्गत केले जाते. परंतु दोन महिन्यांपासून कंत्राटदाराकडून तांदळाचा पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यातील १४५ जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील १५२४६ विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. तालुक्यातील अनेक शाळांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे शालेय पोषण आहारातील तांदूळ उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी दिल्या, गट शिक्षणाधिकारी यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविले. परंतु, तांदळाचा पुरवठा करणारा कंत्राटदार व जिल्हा प्रशासन यांच्यात समस्या निर्माण झाल्यामुळे तांदळाचा पुरवठा कंत्राटदाराने बंद केल्याचे निर्दशनास आले. परिणामी अनेक निरागस बालकांस उपास सहन करावा लागला. शाळेत गळतीची समस्या निर्माण झाली. जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना बंद पडली. 
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी मयुर लाडे यांचेशी संपर्क करण्यात आला व सदर परिस्थितीबद्दल विचारणा केली असता, तांदळाचा पुरवठा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. परंतु शाळांशी संपर्क केला असता अजून पर्यंत तांदळाची खेप शाळांना प्राप्त झाली नसल्याची बाब पुढे आली. अजून किती दिवस वाट पहावी लागणार याबद्दल साशंकता आहे.
बॉक्स -    शालेय पोषण आहारातील तांदळाचा बंद असलेला पुरवठा कंत्राटदाराकडून पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच तालुक्यातील शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येईल. - मयुर लाडे, गट शिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी

  Post Views:   36



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी