NEET पेपरफुटी प्रकरण: विदर्भात सीबीआयचा मोठा दणका; नागपूर, ब्रह्मपुरीसह ३ परीक्षार्थींच्या घरांवर छापे!
ब्रह्मपुरी :
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज विदर्भात मोठी कारवाई केली. सीबीआयच्या पथकाने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एकाच वेळी छापे टाकत तीन परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या घरांची कसून झाडाझडती (सर्च ऑपरेशन) घेतली. या धडक कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची बातमी एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रकाशित केल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून ब्रह्मपुरी मध्ये तो परीक्षार्थी कोण याचा नागरिक शोध घेता आहेत.
एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या विश्वासनीय माहितीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीबीआयच्या दिल्लीतील मुख्य पथकाने थेट नागपूर गाठले. स्थानिक नागपूर सीबीआय टीमला सोबत घेऊन या संयुक्त पथकाने आज पहाटेपासूनच विदर्भातील निश्चित केलेल्या ठिकाणांवर शोधमोहीम सुरू केली. संशयित विद्यार्थ्यांच्या थेट घरी पोहोचून अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.
सीबीआयच्या या कारवाईमध्ये विदर्भातील तीन विद्यार्थी रडारवर आले आहेत. यात येथील दोन संशयित परीक्षार्थी विद्यार्थिनींच्या घरांवर सीबीआयने छापे टाकले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील एका परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या घरी सीबीआयच्या पथकाने धडक देत तपास केला. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या घरी इलेक्ट्रॉनिक पुरावे, परीक्षा संबंधित कागदपत्रे आणि इतर संशयास्पद बाबींची कसून चौकशी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. अशातच आता थेट विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत सीबीआयचे छापे पडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या झाडाझडतीदरम्यान सीबीआयच्या हाती नेमके कोणते महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत? आणि या कारवाईतून पेपरफुटीच्या मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश येणार का? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
या कारवाईमुळे विदर्भातील पेपरफुटीचे हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, याचा पर्दाफाश लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.