मिरची लागवडीदरम्यान काळाचा घाला: बरडकीन्हीत शेतात वीज कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांसह आठ जखमी!

   

ब्रम्हपुरी :
        मिरची लागवडीचे काम सुरू असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह वीज कोसळून आठ शेतमजूर जखमी झाल्याची गंभीर घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास घडली. ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकीन्ही येथील गावाबाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जनाबाई मारुती तलमले यांच्या शेतात हा अपघात घडला. जखमींमध्ये एकाच तलमले कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बरडकीन्ही शिवारात मिरची लागवडीची कामे जोरात सुरू होती. दुपारी दोनच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. शेतात काम चालू असतानाच अचानक शेत परिसरात वीज कोसळली. विजांच्या या तडाख्यामुळे शेतात काम करणारे आठ जण  गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच घबराट आणि गोंधळ उडाला.
       विजेचा तडाखा बसल्याची माहिती मिळताच बरडकीन्ही येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तातडीने आरमोरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी मनीषा गोकुळदास ठाकरे (वय २२) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
          या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ सदस्य जनाबाई मारुती तलमले (वय ७०), रामहरी मारुती तलमले (वय ४५), मनीषा रामहरी तलमले (वय ४०), शुभांगी सुभाष तलमले (वय ३५) सुभाष मारुती तलमले (वय ४०) यांचे सह मनीषा गोकुळदास ठाकरे (वय २२ - गंभीर),मेघा राकेश शेंडे (वय २३) आणि कविता कमलाकर पाकडे (वय ४५) जखमीमध्ये यांचा समावेश आहे.
      वादळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या काळात शेतात काम करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  Post Views:   1286


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी