राजकीय वलय आणि पत्रकारितेचा आडोसा घेऊन रेती व्यावसायिकाकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
राजकीय ओळख आणि मीडियाचा धाक दाखवून एका रेती व्यावसायिकाला लाखो रुपयांनी गंडा घालणाऱ्या आणि खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आम आदमी पार्टी'चा पदाधिकारी असल्याचे सांगणारा मुख्य आरोपी आणि एका न्यूज पोर्टलचा पत्रकार यांच्या या संगनमताने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सौरभ अनिल रामटेके (वय ३०, रा. कुर्झा वार्ड) हे आपल्या ट्रॅक्टरने रेती वाहतुकीचा व्यवसाय करतात. आरोपी नावेद खान याने फिर्यादीला आपण 'आम आदमी पार्टी'चे असून बड्या अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचे भासविले. नदी घाटातून रेती वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन देऊन त्याने सौरभ यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासापोटी फिर्यादीने आपल्या पत्नीचे मंगळसूत्र सोनाराकडे विकून ५०,००० रुपये आरोपी नावेद खानला दिले. एवढेच नव्हे तर, दरमहा ५०,००० रुपये आणि रोजचे २,००० रुपये रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात आरोपी उकळत होता.
काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने फिर्यादीचे ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना पकडले. यावेळी मदतीसाठी धावून येण्याऐवजी आरोपी नावेद खान याने फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली. "तू तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केली आहे आणि ५० हजार रुपयांची मागणी केली आहे," असा खोटा आरोप लावून त्याने फिर्यादीचा व्हिडिओ बनवला.
या कटात आरोपी क्रमांक २ रोहित मेश्राम (पत्रकार, लोक ९ न्यूज मराठी) यालाही सामील करून घेण्यात आले. या दोघांनी संगनमत करून फिर्यादीला जबरदस्तीने न्यूज चॅनेलवर मुलाखत देण्यास भाग पाडले आणि त्यांची सामाजिक बदनामी केली. या व्हिडिओचा आधार घेऊन आरोपी वारंवार खंडणीची मागणी करत होते.
सततच्या त्रासाला कंटाळून सौरभ रामटेके यांनी अखेर ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ४९, ३(५), ३५१(२), ३५२ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास सपोनी शितल खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत. राजकीय दबाव किंवा पत्रकारितेचा गैरवापर करून कुणीही खंडणी मागत असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.