मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी ब्रह्मपुरी नगरपालिकेत त्रि- स्तरीय सुरक्षा प्रणाली

   

ब्रह्मपुरी/का. प्र.
       नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ३६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. निवडणूक प्रक्रिया दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर, सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVMs) नियमानुसार स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून, ती कायदेशीर प्रक्रियेनुसार सील करण्यात आली आहेत. मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी त्रि- स्तरीय सुरक्षा प्रणालीचा अवलंब प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
            याबाबत दिनांक ०३ डिसेंबर २०२५ बैठक नगरपरिषद कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश मासाळ यांनी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस बोलविले होते. 
       सदर बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी सतीश मासाळ यांनी उपस्थित सर्व उमेदवार व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना मतमोजणी, स्ट्रॉंग रूम सुरक्षा व्यवस्था, आचारसंहिता याबाबत यथोचित माहिती दिली. त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली मतमोजणीची तारीख बदलण्यात आली असून मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याचे उपस्थितांना कळविले. तसेच मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले असून स्ट्रॉंग रूमच्या सर्व परिसरात ३ स्तरीय सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यातील पहिला स्तर हा राज्य राखीव दलाच्या नियंत्रणात असून त्यामध्ये इतर अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी आहे. दुसऱ्या स्तरामध्ये विभागातील पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आलेली असून तिसऱ्या स्तरामध्ये स्थानिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सदर परिसरात सर्व प्रकारचा अनाधिकृत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमचा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत असून सीसीटीव्हीचे संपूर्ण नियंत्रण राज्य राखीव दलाकडे सोपविण्यात आले आहे. 
          स्ट्रॉंग रूमचे सील योग्य स्थितीत असल्याची खातरजमा करणे, याकरीता मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, नायब तहसीलदार महानंदा मडावी व लिना बोबाटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना स्ट्रॉंग रूमची २४/७ पाहणी करणे करिता व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी सतीश मासाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे उपस्थित होते.

  Post Views:   436




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी