चार लाख रुपयाचे भंगार घेऊन फरार होणाऱ्या आरोपीस मध्य प्रदेशातून अटक
आरोपीकडून 18.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई
ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीत रमेश नंदनवार यांचे राहूल लोहा स्क्रॅप ट्रेडर्स नावाचे कहाली खंडाळा रोडवर भंगाराचे दुकान आहे. या दुकानात खरेदी केलेला भंगाराचा माल साठवून तो ट्रकने विक्रीसाठी जालना येथे पाठविला जातो. नियमित वाहतूकीसाठी ट्रक उपलब्ध नसल्यास ब्लॅक बक ट्रान्सपोर्ट या मोबाईल अॅपवरून ट्रक बुक करून रमेश नंदनवार हे जालना येथे विक्रीसाठी नियमित पाठवित होते. दि.२५ जुलै २०२५ रोजी नंदनवार यांनी लोहा स्क्रॅप जालना येथे पाठविणे असल्यामुळे मोबाईल अॅप वरून गाडी बूक केली. सदर गाडीवर चालक सलमान शाकीर रा.जबलपूर (मध्यप्रदेश) हा होता. दुसर्या दिवशी राहूल लोहा स्क्रॅप ट्रेडर्स येथे मजूरांच्या हाताने लोहा स्क्रॅप भंगार गाडीत भरण्यात आले. सायंकाळी रमेश नंदनवार यांनी ट्रकचालकाकडे १२ हजार रूपये रोख दिल्यानंतर लोहा भंगार भरलेली गाडी जालनाकडे रवाना झाली. दुसर्या दिवशी ट्रकचालकाला कॉल करून विचारले असता, गाडीचे टायर पंचर झाल्यामुळे मालेगाव येथे थांबून असल्याचे सांगितले. परत दोन तिनदा कॉल केले असता, ट्रकचालकाचा भ्रमणध्वनी बंद दिसून आला.
लोहा स्क्रॅप भंगार सामानाची गाडी जालना येथे पोहचली नसल्याचे रमेश नंदनवार यांच्या लक्षात आले. ट्रकचालक सलमान शाकीर रा.जबलपूर याने लोहा स्क्रॅपचे भंगार सामान जालना येथे न पोहचविता ४ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केली. रमेश नंदनवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 316 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ब्रह्मपुरी पोलिसांनी मोठ्या शिताफिने ट्रक चालकाचा शोध घेतला. सदर गुन्ह्यातील ट्रक चालकाचे नाव सलमान शाकीर नसून अनिस युनूस अली राहणार मध्य प्रदेश असे असल्याचे निष्पन्न झाले. ब्रह्मपुरी पोलिसांना सदर ट्रक हा बोडा जिल्हा राजगड मध्य प्रदेश येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी युसुफ अली वय 25 राहणार वार्ड नंबर 14 बोडा तालुका नरसिंगगढ, जिल्हा राजगड (मध्यप्रदेश) त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीकडून ट्रक व 3.5 लक्ष रुपये किमतीचा नऊ टन लोहा स्क्रॅप भंगार असा एकूण 18.50 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून प्रथमवर्ग न्यायालयात ब्रह्मपूरी पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई ही मुक्कामा सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी, प्रमोद बानबले प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, मुकेश गजबे, अजय कटाई, पोलीस कॉन्स्टेबल इरशाद खान, चंदू कुरसंगे, निलेश तुमसरे, स्वप्निल पळपगार यांनी केली आहे. आरोपी बाबत सायबर शाखा चंद्रपूर येथील पोलीस उपनिरीक्षक झाडोकर व त्यांचे चमुने वेळोवेळी सहकार्य केले आहे.