गुरूदेव भक्तांच्या धडक मोर्चानंतर समाज मंदिर बांधकामाला सुरूवात
ब्रम्हपुरी/का.प्र.
गुरुदेव सेवा मंडळाला दान केलेल्या जागेवरील खासदार निधीतून प्रार्थना करण्याकरिता समाज भवनाचे कामाकरीता निधी प्राप्त झाले. मात्र बाहेर गावातील व्यक्तीने त्या जागेवर आपले अधिकार दाखवून बांधकाम थांबविले. त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या अर्धवट समाज भवनाचे बांधकाम पूर्ण व्हावे व अडथळा निर्माण करणार्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावे, या मागणीसाठी हळदा येथील गुरुदेव भक्तांनी तहसील कार्यालयावर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी यांना दिले.
त्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यापासून बंद असलेले समाज मंदिराचे बांधकाम, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी तहसीलदार सतीश मासाळ यांच्याशी संवाद साधत यशस्वी तोडगा काढल्याबद्दल आणि विना विलंब बांधकामाला सुरुवात झाल्याबद्दल श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी यांनी तहसीलदार व प्रा. देशकर यांचे आभार मानले. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळ असून किमान ५० ते ६० गुरुदेव सेवक परिवार आहेत. ते सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीशी प्रेरित होऊन दररोज सकाळ सायंकाळ प्रार्थना करतात. त्याच बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. याच कार्याने प्रेरित होऊन गावातील प्रमोद राऊत, सुदाम राऊत यांनी आई वडिलांच्या स्मुर्ती निमित्त ४० बाय ३० एकूण १२०० चौ. मीटर जागा गुरुदेव सेवा मंडळास दान दिली. ती जागा ग्रामपंचायत नी गुरुदेव सेवा मंडळाच्या नावे केली आहे. त्याच जागेवर माजी खासदार महोदय यांच्या स्थानिक निधीतून दहा लक्ष रुपयाचा निधी समाज भवना करिता मंजूर झाला व समाज भवनाचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत सुरू होते. मात्र प्रभाकर पांडुरंग धुडसे राह. पालेबारसा ता.सावली या बाहेर गावातील व्यक्तीने बांधकाम विभागास अर्ज करून सदर बांधकाम बंद पाडले. बांधकाम विभागाने कोणतीही चौकशी न करता सदर बांधकाम बंद करण्याचे पत्र दिले. बंद पडलेले काम सुरू करावे यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालय, बांधकाम विभाग यांना विनंती अर्ज केले, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे २० मार्च २०२५ ला बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी रेल्वे फाटक ते तहसील कार्यालय, व पोलीस स्टेशन पायी गुरुदेव भक्तांनी दिंडी भजन काढीत तहसील कार्यालयावर मोर्चाची धडक दिली व आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते.
बांधकाम सुरू करते वेळी माजी सभापती तथा तालुका महामंत्री प्रा.रामलाल महादेव दोनाडकर, सरपंच दौलत गरमडे, भाजपा कार्यकर्ता शंकर आष्टेकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारा उपस्थित होते.