काळजाचा थरकाप! रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; चाकात मान फसल्याने ४३ वर्षीय तरुण फरफटत गेला

   

ब्रम्हपुरी:
        गांगलवाडी परिसरातून स्वगावी परतणाऱ्या एका दुचाकीस्वाराला रानडुकराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. प्रमोद मनोहर सोंडवले (वय ४३, रा. गवर्लाचक-मांगली) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ही घटना बुधवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली.
          प्रमोद सोंडवले हे बुधवारी सायंकाळी गांगलवाडी येथून आपल्या गावी (गवर्लाचक) परतत होते. वाटेत अचानक एका रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रानडुकराची मान थेट दुचाकीच्या पुढच्या चाकात फसली. यामुळे प्रमोद सोंडवले यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते दुचाकीसह काही अंतरापर्यंत रस्त्यावर फरफटत गेले. या भीषण अपघातात सोंडवले यांच्या दोन्ही पायांना आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अपघातस्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रमोद यांना तातडीने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
        वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित विभागाने या घटनेची दखल घेतली असून, घटनेचा पंचनामा आणि पुढील चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

  Post Views:   1279




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी