दुर्दैवी घटना: ब्रह्मपुरी येथील लेंडारी तलावात मासे पकडताना एकाचा बुडून मृत्यू

   

ब्रह्मपुरी/ का. प्र.
          मासे पकडण्यासाठी तलावात गेलेल्या एका इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवार दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता च्या सुमारास ब्रम्हपूरी शहरातील पेठवार्ड येथील लेंडारी तलावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

           प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील वाल्मिकी नगर परिसरात राहणारा दीपक मोतीराम दिघोरे हा शहरातील पेठ वार्ड येथील लेंडारी तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला.
काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. आसपासच्या इतर मासेमारी करणाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आला आहे.

        दीपक दिघोरे हा वाल्मिकी नगरचा रहिवासी असून त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लेंडारी तलाव परिसरात मासेमारीसाठी अनेक लोक जात असतात, मात्र आजच्या या घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  Post Views:   1752




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी